अपघातानंतर ३ दिवस उपचाराविना अपघातस्थळीच पडून राहीलेल्या तरुणाचा शोध सुरु असताना मृतदेह सापडला आहे. तालुक्यातील सापुचेतळे ते खानवली रोडवर साई मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या वळणाच्या रोडच्या उजव्या बाजूला चरीमध्ये एका ३० वर्षीय तरुणाचा शुक्रवारी १० ऑक्टोबर रोजी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या घटनेप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील खानवली येथील ईश्वर रवींद्र सुर्वे (३० वर्षे, रा. खानवली ईवलकरवाडी ता. लांजा) हा सोमवार दि. ६ ऑक्टोबरपासून घरी न आल्याने त्याचा नातेवाईक, गावामध्ये तसेच मित्रमंडळी यांच्याकडे शोध सुरू होता. या शोध मोहिमेदरम्यान शुक्रवारी १० ऑक्टोबर रोजी त्याचा मृतदेह हा सापुचेतळे ते खानवली रोडवरील साई मंदिराच्या नजीक वळणावर असलेल्या चरित कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबतची खबर त्याचा भाऊ वृषल सुर्वे (२७ वर्षे, रा. खानवली इवलकरवाडी) याने लांजा पोलीस ठाण्यात दिली आहे.
ईश्वर रवींद्र सुर्वे हा सोमवारी ६ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या नंतर आपल्या ताब्यातील स्प्लेंडर मोटरसायकल (क्र. एमएच.०८. एन. ०१३२) घेवून सापुचेतळे ते खानवली रस्त्याने आपल्या घरी येत होता. या म ार्गावरील साई मंदिराच्या मागील बाजूस वळणावर त्याच्या मोटरसायकलचा अपघात होवून तो मोटरसायकल सहित रोडच्या बाहेर जावून चरीमध्ये पडला होता. या अपघातात त्याला गंभीर दुखापती झाली होती. तीन दिवस तो याठिकाणी पडून होता. शोध मोहीम दरम्यान तो चौथ्या दिवशी चरीमध्ये मृतावस्थेत आढळून आला. दरम्यान, सोमवार दि. ६ ऑक्टोबर पासुन गायब झालेल्या ईश्वर सुर्वे यांचा मृतदेह शुक्रवारी १० ऑक्टोबर रोजी रस्त्याच्या चरीत कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याचा भाऊ वृशल सुर्वे याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार लांजा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड. कॉन्स्टे. नासिर नावळेकर हे करत आहेत.