जिल्ह्यातील तरुणांना रोजगार आणि उद्योजक्तेसाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या विशेष प्रयत्नातून व पाठपुराव्यातून अद्ययावत कौशल्यवर्धन केंद्र साकारले जात आहे. एमआयडीसी’ आणि टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येत असलेले चंपक मैदानातील हे केंद्र आता अंतिम टप्प्यात आहे. रत्नागिरीतील विद्यार्थ्यांसाठी आणि जिल्ह्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीची शक्यता आहे. एमआयडीसीच्या जागेवर १ एकर जागेत हे अत्याधुनिक केंद्र उभे राहत आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १९६.२८ कोटी इतका मोठा खर्च अपेक्षित आहे. यापैकी, टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कडून १६५.१० कोटी आणि एम आयडीसीकडून ३१.११ कोटी असा निधी उपलब्ध झाला आहे.
केंद्राच्या उभारणीचे काम जलद गतीने सुरू आहे. आवश्यक यंत्रसामुग्रीही दाखल झाली आहे, ज्यामुळे हे केंद्र काही महिन्यांतच सुरू होण्याची शक्यता आहे. दरवर्षी सुमारे ७ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची क्षमता या केंद्रामध्ये आहे. केंद्रात आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योग व्यवसायांना आवश्यक असणारी कौशल्ये शिकवली जातील. अभ्यासक्रमांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता सारख्या अत्याधुनिक प्रशिक्षणाचाही समावेश असणार आहे. हे केंद्र तंत्रज्ञानाच्या युगातील वाढती कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. हा प्रकल्प केवळ एक प्रशिक्षण केंद्र नसून, रत्नागिरीच्या औद्योगिक विकासाला दिशा देणारे मोठे पाऊल आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मतदारसंघातील तरुणांना त्यांच्या जिल्ह्यातच आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण घेऊन नोकरी मिळवण्याची किंवा स्वतः चा व्यवसाय सुरू करण्याची संधी या केंद्रामुळे मिळेल.
त्याचबरोबर, स्थानिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना प्रशिक्षित आणि कुशल काम गार मिळाल्याने त्यांच्या उत्पादकतेत आणि विकासात लक्षणीय वाढ होईल. महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि गडचिरोली नंतर सुरू होणारे हे केंद्र कोकणातील तरुणांच्या भविष्यसाठी एक वरदान ठरणार आहे. टाटा संचलित हे केंद्र रत्नागिरी जिल्ह्याच्या शैक्षणिक आणि औद्योगिक विकासाला नवी दिशा देणार असून, स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती देईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.