रत्नागिरी जिल्हा परिषद गटांचे आरक्षण सोमवारी जाहीर झाले असून आगामी निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. काही माजी सदस्यांना आपला मतदारसंघ गमवावा लागला आहे, तर बहुतेकांच्या मनाजोगते आरक्षण पडल्याने आनंद झाला आहे. मतदारसंघ गमवावा लागलेल्या काही दिग्गजांनी दुसऱ्या गटाची/गणाची चाचपणी सुरू केली आहे.
असे पडले आरक्षण – रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती सूर्यवंशी सभागृहामध्ये सोमवारी आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी जिंदल आणि उपनिवासी जिल्हाधिकारी चंद्रकांत यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली. एकूण ५६ गटांचे आरक्षण जाहीर झाले आहे. १ गट अनुसूचित जाती, २ अनुसूचित – जमातींसाठी तर ८ गट ओबीसी महिला, ७ गट ओबीसी आणि १८ गट सर्वसाधारण महिला आरक्षित झाले आहेत. २० गटांमध्ये सर्वसाधारण आरक्षण पडले आहे.
माजी अध्यक्षांचा मार्ग मोकळा – आरक्षण जाहीर होताच जि.प.चे म ाजी अध्यक्ष व्यक्ष रोहन बने, विक्रांत जाधव, सौ. रचना महाडिक, उदय बने, सौ. स्वरूपा साळवी यांचे मतदारसंघ शाबूत राहिले आहेत. सर्वसाधारण गटासाठी ते खुले झाले आहेत. जि.प. चे माजी उपाध्यक्ष संतोष थेराडे, माजी सभापती प्रकाश रसाळ, परशुराम कदम, सहदेव बेटकर यांनाही दिलासा मिळाला आहे. जुना करबुडे जि.प. गट आता खालगाव या नावाने ओळखला जाणार असून तो सर्वसाधारण गटासाठी खुला झाल्याने भाजपचे इच्छुक देसाई यांच्यासह उदय बने यांचा मार्गही सुकर झाला आहे. कोतवडे जिल्हा परिषद गट सर्वसाधारण नागरिकांसाठी खुला झाला आहे. ही जागा महायुती झाल्यास भाजपच्या वाट्याला येवू शकते. माजी उपाध्यक्ष सतिश शेवडे यांना उमेदवारी मिळू शकते. शिवसेनेच्यावतीने सौ. साधना साळवी यादेखील इच्छुक आहेत. कर्ला जि.प. गटामध्ये महेंद्र झापडेकर यांना संधी मिळेल. त्यांच्या पत्नी सौ. देवयानी झापडेकर या येथे प्रतिनिधीत्व क़रत होत्या.
स्वरूपा साळवी, चाळकेंना दिलासा – दाभोळे जि.प. गट सर्वसाधारण गटासाठी खुला झाला असून माजी सभापती आणि शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विलास चाळके हे इच्छुक आहेत. त्याचप्रमाणे माजी सभापती जया माने हेदेखील इच्छुक आहेत. लांजातील गव्हाणे जि.प. गटातून माजी अध्यक्षा सौ. स्वरूपा साळवी यांना पुन्हा संधी मिळू शकते. उबाठाचे जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम हेदेखील या मतदारसंघातून लढणार असल्याचे बोलले जाते.
बाबू म्हापना धक्का – शिवसेनेचे रत्नागिरी तालुकाप्रमुख आणि पालकमंत्री ना. उदय सामंत यांचे निकटवर्तीय मानले जाणारे बाबू म्हाप यांचा पूर्वीचा मिरजोळे जि.प. गट आता खेडशी या नावाने ओळखला जाणार असून तो महिला राखीव झाला आहे. त्यामुळे बाबू म्हाप यांना अन्य मतदारसंघ शोधावा लागणार आहे. सावर्डा जिल्हा परिषद गट खुला झाल्याने आ. शेखर निकम यांच्या पत्नी सौ. पूजा निकम यांना संधी मिळू शकते. मात्र माजी सभापती विनोद झगडे, आप्पा कदम, सुनील मोरे यांच्यापदरी आरक्षणाने निराशा टाकली आहे.
नेत्रा ठाकूरांना संधी – जि.प. अध्यक्षपदाच्या दावेदार म निल्या जाणाऱ्या गुहागरच्या नेत्रा ठाकूर यांना मनाजोगते आरक्षण पडले आहे. त्यामुळे त्यांचाही मार्ग मोकळा झाल्याचे चर्चिले जाते. एकंदरीत पडलेले आरक्षण पाहता अनेक इच्छुकांना दिलासा मि ळाला आहे. आता महायुती होते का? महाविकास आघाडी एकत्र लढते की प्रत्येक पक्ष स्वबळावर लढतो, याची चर्चा सुरू झाली आहे.