जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-जिल्हा रुग्णालयात सध्या केवळ १० दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक आहे. प्लेटलेटचीही कमतरता जाणवत असून, दररोज सरासरी ३०हून अधिक रक्ताच्या पिशव्या व ८० हून अधिक प्लेटलेटची गरज भासत आहे. त्यामुळे प्लेटलेटसाठीच्या बॅगा २ दिवस पुरतील एवढ्याच आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालय प्रशासनाने नागरिकांना आणि विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय संस्थांना स्वतःहून रक्तदान करावे तसेच रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन केले आहे जेणेकरून रक्तसाठा वाढवून रुग्णांचे जीव वाचवता येतील. रुग्णालयात रत्नागिरीसह जिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. या काळात रक्ताची मोठी कमतरता भासते. विशेषतः उन्हाळी सुटी व सणासुदीच्या काळात ही समस्या अधिक तीव्र होते. शाळा-महाविद्यालये बंद असतात, नोकरदारवर्ग आपल्या मूळ गावी जातो त्यामुळे रक्तदात्यांची उपस्थिती कमी होते.
खासगी रक्तपेढ्यांकडून रक्त संकलित केले जाते; परंतु काहीवेळा त्या ठिकाणीही रक्तसाठा उपलब्ध नसतो. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना रक्तासाठी भटकंती करावी लागते. काहीवेळा रक्त असूनसुद्धा रुग्णालयात वेळेवर उपलब्ध नाही असे सांगितले जाते, अशी तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. आता दिवाळीच्या सुट्या सुरू होत असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. सध्या जिल्हा रुग्णालयात फक्त १० दिवसांचा रक्तसाठा असल्याने लवकरात लवकर रक्तदानाची आवश्यकता आहे. खासगी ब्लडबँकांमधून अनेकदा जादा पैसे देऊन रक्त घ्यावे लागत असल्याने सर्वांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

