आज काहीजण स्वबळाची भाषा करत आहेत. त्यांनी खरंच स्वबळावर निवडणूक लढवून दाखवावी, मग काय करायचं ते आम्ही ठरवू. मात्र आम्ही महायुतीचा धर्म पाळणार आहोत, अशी स्पष्ट भूमिका राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी मांडली. शहरातील बहादूरशेख नाका येथील पुष्कर सभागृहात शिवसेनेची पदाधिकारी बैठक पार पडली. या बैठकीनंतर ना. उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला. ते पुढे म्हणाले, जिल्ह्यात ग्रामीण तसेच शहरी भागात शिवसेनेची मजबूत पकड आहे. तरीही आम्ही महायुतीसाठी आग्रही आहोत. आमचे नेते उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की निवडणुका महायुतीच्या माध्यमातूनच लढवल्या जातील. त्यामुळे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, त्याप्रमाणे सर्वांनी काम करावे. ना. सामंत पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्याबाबत अनादर होईल असे आम्ही कधीही बोललो नाही. चिपळूणमध्ये काही जण स्वबळाची भाषा करत आहेत; त्यांनी तसे जाहीर करावे.
आमचे कार्यकर्तेही त्यांना योग्य उत्तर देतील. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, पण तें करताना संघटन मजबूत करणे आणि नम्रतेने पक्षवाढ करणे हेच आपले ध्येय असले पाहिजे. जो पक्ष वाढवेल, पक्षासाठी झटून काम करेल, जो कार्यकर्ता निवडून येऊ शकेल अशांनाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारी जाईल. मात्र ही उमेदवारी देण्याचा सर्वस्वी अधिकार ना. एकनाथ शिंदे यांनाच आहे, मलाही नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. तर यावेळी त्यांनी सोशल मीडियावर कायम प्रकाश झोतात असणारे शहर प्रमुख उमेश सकपाळ यांचेही कौतुक केले.

