24.5 C
Ratnagiri
Sunday, December 7, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeChiplunचिपळूणकर संतापले, सोनपात्रा नदी त्यांच्या 'बापाची पेंड' आहे का?

चिपळूणकर संतापले, सोनपात्रा नदी त्यांच्या ‘बापाची पेंड’ आहे का?

तसेच कोतवली, पेवे व वाशिष्ठी नदीच्या खोऱ्यातील नद्यांचे पाणी प्रदुषित बनले.

प्रदुषित पाणी बिनदिक्कतपणे रात्रीच्या अंधारात नदीत सोडणाऱ्या लोटे परशुराम परिसरातील काही ‘नामचीन’ उद्योगांबद्दल चिपळूण, खेड व दापोली परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी रात्री कोसळणाऱ्या घमासान पावसाचा गैरफायदा घेत त्या उद्योगांनी आपले रासायनिक सांडपाणी थेट नाल्यात आणून सोडले त्यामुळे सोनपात्रा नदीसोबतच कोतवली, पेवे व वाशिष्ठी नदीच्या खोऱ्यातील पाणी प्रदुषित झाले.. या प्रदुषित पाण्याचे परिणाम आता जाणवू लागले आहेत. या विरोधात कोतवली गावच्या सरपंचांनी थेट पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आणि लोटे परशुराम परिसरातील काही कारखान्यांच्या विरोधात पोलिस स्थानकात फौजदारी गुन्हा दाखल झाला. या बेमुर्वत कारखान्यांच्या संचालकांवर व अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा प्रयत्नाचा फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी नागरिकांनी मागणी केली आहे.. सोनपात्रा नदी ही आपल्या बापजाद्याची पेंड आहे असे ते समजतात काय? अशी संतप्त भावना जनतेतून खुलेआम व्यक्त होऊ लागली आहे. किती वर्षे लोटली तरी लोटे परशुराम परिसरातील काही उद्योगांची मस्ती कायम आहे असेच म्हणावे लागेल अशा शब्दात याबाबत जनतेतून आता तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे.

सोकावलेले बोके ! – बुध. दि. २९ ऑक्टो. २०२५ रोजी कोसळलेल्या घमासान पावसाचा गैरफायदा या सोकावलेल्या बोक्यांनी घेतला. लोटे परशुराम परिसरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी तेथे सांडपाणी प्रक्रिया केंद्र कार्यरत आहे. तेथे सांडपाणी दिले तर फी पडते म्हणून २ चव्वल वाचवण्यासाठी या सोकावलेल्या उद्योगांनी रात्रीच्या अंधारात व घमासान कोसळणाऱ्या पावसाचा. गैरफायदा उठवत ते रासायनिक सांडपाणी थेट जवळच्या नाल्यात सोडले.

नद्यांचे पाणी प्रदुषित – नाल्यातून हे पाणी सोनपात्रा नदीत जाऊन मिसळले त्यामुळे सोनपात्रा नदीचे पात्र तसेच कोतवली, पेवे व वाशिष्ठी नदीच्या खोऱ्यातील नद्यांचे पाणी प्रदुषित बनले. हे पाणी काळे, निळे व लालसर रंगाचे दिसू लागले. त्यावर प्रचंड प्रमाणात फेस व बुडबुडे तयार झाले आणि या पाण्याच्या उग्र व रासायनिक वासाने सारा परिसर भरुन गेला. हे झाल्यावर चिपळूण, खेड व दापोली परिसरातील नागरिक जे काही समजायचे ते समजले व नेमके काय घडले ते त्यांनी शोधून काढले.

त्यांना सोयरसुतक नाही – काही महिन्यांपूर्वी प्रदुषण नियंत्रण मंडळाने काही उद्योगांना सांडपाणी व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल नोटीसा बजावल्या होत्या. एवढेच नव्हे तर १५ दिवसांपूर्वी घडलेल्या एका घटनेत एका बलाढ्य उद्योगावर कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आलेला आहे. असे असताना या सोकावलेल्या बोक्यांना त्याचे जणू काहीही सोयरसुतक नाही! काही उद्योगांनी पुन्हा तशाच प्रकारे रात्रीच्यावेळी गुपचूपपणे पाणी सोडण्यास सुरुवात केली. हे पाणी थेट स्थानिक नाल्यातून प्रवाहित होऊन नदीमध्ये मिसळते.

जनतेचे आरोग्य धोक्यात – या प्रदुषित पाण्यामुळे चिपळूण, खेड, दापोली तालुक्यातील नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याला जबर धोका निर्माण झाला. तसेच या प्रदुषित पाण्यामुळे नदीतील मासे विषारी बनले व मरुन नदीकिनारी पसरले. या प्रदुषित पाण्याचा या नद्यांच्या खोऱ्यातील शेतीवर देखील फार मोठा परिणाम झाला. अनेक ठिकाणी शेती करपली तर ठिकठिकाणी शेतीच्या दळ्यांमध्ये हे काळे, निळे, लालसर उग्र वासाचे प्रदुषित पाणी साठून राहिले. त्यामुळे शेतीचे उत्पन्न धोक्यात आले.

हाहाकार माजला – एवढेच नव्हे तर या साऱ्या परिसरातून पाळीव जनावरे हे प्रदुषित पाणी प्यायल्यामुळे आजारी पडली. अनेकांना पोटाचे विकार, अॅलर्जी व त्वचारोग वाढले असे याबाबत माहिती देताना अनेक शेतकऱ्यांनी व गुन्नागरिकांनी संतापाने सांगितले. यामुळे शेतीचे उत्पादन बाधीत झाले आणि मच्छिमारांचे तर अपिरिमित नुकसान झाले. एवढा हाहाकार माजला असतानाही हे निर्वावलेले उद्योग बिनधास्तपणे सुरु आहेत याबाबत ग्रामस्थांनी वैषम्य व्यक्त केले.

‘ते’ उद्योग बंद करा ! – या सोकावलेल्या व ‘नामचीन’ उद्योगांवर त्वरीत कारवाई करण्यात यावी, त्यांचे उद्योग ताबडतोब बंद ठेवण्यात यावेत आणि त्यांनी प्रदुषित सांडपाण्याबाबत आवश्यक ती उपाय योजना केल्यानंतरच ते कारखाने पुन्हा सुरु करण्याबाबत विचार करण्यात यावा असे खणखणीत प्रतिपादन चिपळूण, खेड, दापोली परिसरातील नागरिकांनी याबाबत बोलताना सडेतोडपणे व्यक्त केले.

RELATED ARTICLES

Most Popular