गेल्या महिनाभरात कोकणात झालेल्या सततच्या पावसामुळे भातशेती आणि नाचणी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे तहसीलदार चिपळूण तसेच तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात कोकणातील सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे त्वरित करून सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची शेती जमीनदोस्त झाली असून भातशेती आणि नाचणीची पिकं पूर्णपणे वाया गेली आहेत. वर्षभराचा काबाडकष्ट वाया गेल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला आहे असे म्हटले आहे. या निवेदनात बळीराम गुजर यांनी म्हटले की, गावोगावी पंचनामे करताना प्रत्येक गावाला एक अधिकारी किंवा शासकीय कर्मचारी नियुक्त करावा, जेणेकरून पंचनामे लवकर पूर्ण होतील आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळेल.
यावेळी झालेल्या चर्चेत विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव उर्फ बाळा कदम यांनी चिपळूण शहरातील शंकरवाडी, मुरादपूर, गोवळकोट, उक्ताड, खंड परिसर, मतेवाडी आदी चिपळूण शहराच्या भागातील शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाल्याचे नमूद केले. त्यांनी म्हटले की, कोकणातील शेतकरी मदत मागत नाही, पण आता परिस्थिती बिकट आहे. शहरातील शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. नैनेश नारकर यांनी पंचनामे नीटपणे करण्याची मागणी केली, तर सचिन शेट्ये यांनी पंचनामे जलदगतीने पार पाडावेत असे सांगितले. महिला पदाधिकारी धनश्री शिंदे आणि रूमा देवळेकर यांनी पंचनामे करण्यासाठी अधिकाऱ्यांची संख्या वाढविण्याचा आग्रह धरला. सचिन चोरगे यांनी यावेळी सांगितले की, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीतच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र सरकारने रत्नागिरी जिल्ह्यातील सात तालुके यादीतून वगळले. आता परतीच्या पावसाने उरलेली पिकंही नष्ट झाली आहेत. त्यामुळे शेतकरी अक्षरशः कोलमडला आहे. तहसीलदारांनी या सर्व मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिला.

