यात्रा संपल्यानंतर सोमवारी (ता. ३) सकाळी बाजारपेठेत प्लास्टिक आणि टाकाऊ पिशव्या, इतर वस्तूंचा खच पडला होता. पालिका कर्मचाऱ्यांनी सकाळी वाहतूक बंद करून त्याची साफसफाई केली. रत्नागिरीतील विठ्ठल मंदिरामध्ये कार्तिकी एकादशीनिमित्त रविवारी मोठी यात्रा भरली होती. मोठ्या प्रमाणात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. दरम्यान, या यात्रेनिमित्त परजिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात व्यापारी दाखल झाले होते. पावसाने दिवसभर विश्रांती घेतल्यामुळे व्यापारी आणि भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. परजिल्ह्यातील अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने थाटली होती. रामआळी, मारुती आळी, गोखलेनाका, धनजीनाका, गाडीतळ परिसर, काँग्रेस भवन या भागात शेकडो स्टॉल लागले होते. यात्रेच्या आधी एक दिवस अनेक व्यापारी बाजारपेठेत जागा पकडण्यासाठी आले होते. अनेक ठिकाणी दगड, स्टॉल किंवा आपल्या वस्तूंची बोचकी ठेवून जागा आरक्षित केली होती. त्याचा चांगला फायदा स्थानिक व्यापाऱ्यांनी उठवला.
बाजारपेठेतील दुकानांपुढे बाहेरून आलेल्या व्यापाऱ्यांना सुमारे पाच ते सहा हजार रुपये भाड्याने जागा दिल्या होत्या. यात्रेला विविध ठिकाणचे सुमारे साडेतीन ते चार हजार व्यापारी आले होते. सर्व प्रकारच्या वस्तू, कपडे, खेळणी, खाद्यपदार्थ आदींचा यामध्ये समावेश होता. ऊन पडल्याने गर्दी वाढत गेली त्यामुळे मोठी उलाढाल झाली; परंतु रात्री साडेनऊ वाजल्यानंतर अचानक वातावरण बदलले आणि पाऊस सुरू झाला. विठ्ठलाच्या दर्शनाबरोबरच यात्रेतील खरेदीसाठी आलेल्यांची तारांबळ उडाली. साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी स्टॉलधारकांना कसरत करावी लागली. कपडे विक्री करणाऱ्यांचे पावसामुळे थोडे नुकसानही झाले. पावसाळी वातावरण लक्षात घेऊन काही व्यापाऱ्यांनी रात्री उशिरा आवरते घेत काढता पाय घेतला. रात्री रथयात्रेसाठीही रत्नागिरीकरांनी प्रचंड गर्दी केली होती.
पाच ट्रॅक्टर कचरा उचलला – यात्रेमुळे रत्नागिरी शहरातील, रामआळी, मारुतीआळी, गोखलेनाका, पोस्ट कार्यालय, लक्ष्मीचौक आदी ठिकाणी कचऱ्याचा खच पडला होता. प्लास्टिक पिशव्या, खाद्यपदार्थ, भाजीपाला, ऊस आदींचा प्रचंड कचरा पडला होता. सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते; मात्र पालिका कर्मचाऱ्यांनी सकाळी वाहतूक बंद करून मुख्य बाजारपेठेची साफसफाई केली. सुमारे चार ते पाच ट्रॅक्टर कचरा निघाला.

