देशामध्ये वाढत जाणार्या महागाईचा फटका सामान्य जनतेला बसायला सुरुवात झाली आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तुच्या किमतीमध्ये होणार्या भरमसाठ वाढीमुळे सर्वसामान्य जनतेची व्यवहाराची आर्थिक घडी विस्कटली आहे.
एके काळी ४००-५०० रुपयांच्या दरम्यान असणारा घरगुती वापराचा सिलेंडरची किंमत आता कोरोना काळापासून वाढतच चालली आहे. सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर या सर्व किमती जाऊ लागल्या आहेत. ग्राहकांना येत्या काळामध्ये प्रति एलपीजी सिलेंडर १००० रुपये तरी मोजावे लागणार आहेत. तर दुसरीकडे, केंद्र सरकारने एलपीजी सिलेंडरवरील सबसिडी पूर्णपणे बंद करण्याच्या निर्णयात आहे.
सध्यातरी अशी कोणतीही अधिकृतरित्या बातमी समोर आलेली नाही. परंतु, सरकारने केलेल्या अंतर्गत मूल्यांकनातून ग्राहक सिलिंडरसाठी एक हजार रुपयांपर्यंत पैसे खर्च करण्यास तयार आहेत, असे समोर आले आहे. यामुळे एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये ग्राहकांना सबसिडी म्हणून ३,५५९ कोटी रुपये वितरीत केले होते. २०१९-२० या आर्थिक वर्षात तोच खर्च २४,४६८ कोटी इतके रुपये होता. म्हणजेच वर्षभरातच सरकारने सबसिडीमध्ये सुमारे ६ पट कपात केली. यामुळे सरकारवरील अनुदानाचा भार एका वर्षात ६ पटीने कमी केला गेला आहे.
भारतात साधारण २९ कोटी लोकांकडे एलपीजीचे कनेक्शन आहे. सध्याच्या नियमांनुसार, जर तुमचे वार्षिक उत्पन्न १० लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला एलपीजी सिलेंडरवरील सबसिडीचा लाभ मिळणार नाही. या व्यतिरिक्त, मे २०२० मध्ये काही ठिकाणी एलपीजीवरील सबसिडी पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.