केंद्र सरकारच्या त्रिसूत्री योजनेप्रमाणे पहिलीपासून हिंदी सुरू केले तर छोट्या मुलांवर बोजा पडेल. त्यामुळे पहिलीपासून हिंदी नकोच तर हिंदी पाचवीपासून अनिवार्य करावे, असा प्रस्ताव रत्नागिरी जिल्हा शिक्षण संस्थाचालकांच्या सभेत सर्वानुमते घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी सदानंद भागवत होते. या संबंधीचा प्रस्ताव रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अॅड. विलास पाटणे यांनी मांडला. त्याला नवनिर्माण शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सर्वानुमते हा प्रस्ताव संमत झाला. सातत्याने आठ वर्षे कोकणातील विद्यार्थी महाराष्ट्रात दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रथम येतात; परंतु स्पर्धा परीक्षांकडे गांभीर्याने पाहत नाहीत. शिक्षणसंस्थांनी याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अॅड. विलास पाटणे यांनी केले.
वेतनेतर अनुदान, पवित्र पोर्टल, शिपाई, शिक्षकांच्या नियुक्त्या अनुकंपा नेमणुका, मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शुल्क या संदर्भात भारत शिक्षण मंडळाचे उपकार्याध्यक्ष श्रीराम भावे यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. अभिजित हेगशेट्ये यांनी संघटनेचा दबाव वाढवून कामे झाली पाहिजेत, असे आग्रही प्रतिपादन करून पदाधिकाऱ्यांनी संपर्क वाढवला पाहिजे, यावर भर दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर टीईटी अनिवार्य आहे, असे सर्व सदस्यांचे एकमत झाले. सभेला लांजाचे जयवंत शेट्ये व विजय खवळे, चिपळूणचे सुधीर दाभोलकर, रिगलचे संजय शिर्के, खेडचे आर. डी. खतीब, आयनीचे डॉ. संजय कान्हेरे, पावसचे संतोष सामंत, कोंडगे येथील श्रीधर विश्वासराव, आसगे येथील राजाराम चव्हाण, तळवडेचे दिगंबर पाटोळे आदी संस्थाचालक उपस्थित होते. आभार भाई शिंदे यांनी मानले.
तालुकानिहाय सभा – नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात तालुकानिहाय सभा व नंतर जिल्हा अधिवेशन चिपळूणमध्ये घेण्यात येईल, अशी घोषणा शिक्षण संस्थाचालक संघाचे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी केली.

