पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे डांबराने भरून रस्ता वाहतुकीस योग्य करण्यात येईल, असे आश्वासन महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाला बांधकाम विभागाच्या उपअभियंत्याने दिले. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे त्वरित भरले जातील, असा दिलासा मिळाला आहे. खेडर्डी-टेरव रस्त्याची गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, वाहनचालक आणि पादचारी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गणपती, नवरात्र आणि दीपावलीसारखे मोठे सण संपून गेले तरीही रस्त्यावरील खड्ड्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्षच होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. स्थानिक ग्रामस्थ आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी वेळोवेळी प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.
याबाबत त्यांना निवेदने देण्यात आले; मात्र ठोस उपाययोजना न झाल्यामुळे आज महाविकास आघाडीच्यावतीने उपअभियंता यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. या वेळी युवासेना तालुकाप्रमुख उमेश खताते यांनी स्पष्ट इशारा दिला की, जर पुढील १० ते १५ दिवसांत खेर्डी-टेरव रस्ता खड्डेमुक्त झाला नाही तर शिवसेनेच्यावतीने मोठे आंदोलन उभे केले जाईल. नागरिकांचा त्रास आम्ही अधिक काळ सहन करू देणार नाही. त्या वेळी बांधकाम विभागाच्या उपअभियंत्याने पंधरा दिवसात रस्ता दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी शिवसेना विभागप्रमुख विजय शिर्के, काँग्रेस उपतालुका अध्यक्ष सुबोध सावंतदेसाई, महिला आघाडी उपतालुका संघटिका दीप्ती सावंतदेसाई, शिवसेना उपविभागप्रमुख इक्बाल बेबल, रमेश शिंदे, युवासेना उपविभागप्रमुख मुराद चौगुले आदी उपस्थित होते.

