24.1 C
Ratnagiri
Wednesday, November 12, 2025

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...

गणपतीपुळे समुद्रात बुडून एकाचा मृत्यू, दोघांना वाचविण्यात यश

रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील...
HomeRatnagiriरेशन दुकानदारांची दिवाळी 'कडू', पालकमंत्र्यांना निवेदन देणार

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जुलैपासून आजपर्यंत कमिशनचा एकही रुपया दिलेला नाही.

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन अद्यापही न मिळाल्याने त्यांची दिवाळी कडू झाली आहे. यामुळे दुकानदार नाराज असून, लवकरच पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह पुरवठा विभागाला निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा रेशनिंग व केरोसिन चालक-मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक कदम यांनी दिली. ते म्हणाले, शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या हक्काचे देत असलेले धान्य वाटण्याचे काम जिल्ह्यातील रेशन दुकानदार प्रामाणिकपणे करत आहेत. ते करत असताना शासनाच्या अनेक अटींची पूर्तताही केली जात आहे. असे असताना याच दुकानदारांना त्यांच्या कष्टाचे कमिशन वेळेत मिळत नाही. त्यामुळे दुकानदारांवर उपासमारीची वेळ येत आहे. हा प्रकार संघटनेच्या माध्यमातून आमदार शेखर निकम यांच्यासह लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवण्यात आला होता. त्यानुसार आमदार निकम यांनी पुढाकार घेत काही महिन्यांपूर्वी अन्न व नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घडवून आणली.

या वेळी थकीत कमिशन तत्काळ मिळावे, दुकानदारांना २०१४ पासून लागू केलेल्या अन्नसुरक्षा कायद्यापासून महागाईप्रमाणे कमिशन वाढ करावी, २०१३ ते १८ या कालावधीतील धान्य वाहतुकीच्या फरकाची रक्कम मिळावी, धान्यविक्रीचे कमिशन विक्री होताच मिळावे, अशा अनेक मागण्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर केवळ जून महिन्याचे कमिशन देण्यात आले; मात्र जुलैपासून आजपर्यंत कमिशनचा एकही रुपया दिलेला नाही. त्यामुळे दुकानदारांना दिवाळी सणही उत्साहाने साजरा करता आला नाही. त्यामुळे आमचे पैसे देण्यासाठी शासन इतके कठोर का वागते, असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे संघटनेच्या माध्यमातून लवकरच पालकमंत्री सामंत, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देणार असून, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचीही भेट घेणार असल्याचे कदम यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular