कोल्हापूर शाहूवाडी तालुक्यातील गोळीवडे येथे कंक दाम्पत्याचा खून करणाऱ्या आरोपीनेच रत्नागिरी जिल्ह्यातील रायपाटण टक्केवाडी (ता. राजापूर) येथे वृद्धेचा खून केल्याचे पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. या वृद्धेचा खून करून आल्यानंतर दोन दिवसांनी त्याने कंक दाम्पत्याचा खून केला. त्यानंतर पुन्हा कोकणात जाऊन त्याने दोन घरफोड्या केल्या होत्या. या गुन्ह्यांच्या तपासासाठी आरोपी विजय मधुकर गुरव (वय ४८, रा. शिरगाव, ता. (शाहूवाडी) याचा ताबा रत्नागिरी पोलिसांनी सोमवारी घेतला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील रायपाटण येथे घरात एकट्या असलेल्या वैशाली शांताराम शेट्ये (वय ७२) यांचा मृतदेह १५ ऑक्टोबरला सकाळी आढळला होता.
चोरीच्या उद्देशाने गळा आवळून अज्ञाताने त्यांचा खून केल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर चार दिवसांनी शाहूवाडी तालुक्यातील गोळीवडे येथील शेतात निनू यशवंत कंक (७०) आणि रखुबाई कंक (६५) या दाम्पत्याचे मृतदेह आढळले होते. कंक दाम्पत्याच्या खुनाचा उलगडा झाल्यानंतर रत्नागिरी पोलिसांकडून रायपाटण येथील वृद्धेच्या खुनाचा तपास गतिमान झाला होता. त्या परिसरात आरोपी गुरव याचे मोबाइल लोकेशन मिळाले. काही सीसीटीव्ही फुटेजमध्येही तो आढळला. शेट्ये यांच्या घरातून गेलेल्या मुद्देमालापैकी काही वस्तू आरोपी गुरव याच्याकडे पोलिसांना मिळाल्या आहेत. यावरून त्यानेच शेट्ये यांचा खून केल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
आठवड्यात सात गुन्हे – सराईत गुन्हेगार विजय गुरव याने प्रथम एक मोबाइल चोरला. त्यानंतर कोकणात जाऊन वृद्धेचा खून केला. तिथून एक दुचाकी चोरली. त्यानंतर शाहूवाडी तालुक्यात येऊन कंक दाम्पत्याचा खून केला. त्यानंतर दुसरी दुचाकी चोरून तो कोकणात गेला. त्यानंतर दोन घरफोड्या करून तो कोकणात लपला होता. एकाच आठवड्यात त्याने सात गुन्हे केले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली दिली.

