मिऱ्या रत्नागिरीच्या किनाऱ्याची गेल्या पाच वर्षांपासून ओळख बनलेले ‘बसरा स्टार’ हे अजस्त्र जहाज आता लवकरच इतिहासजमा होणार आहे. खडकातून या जहाजाची आता सुटका झाली आहे. ३ जून २०२० रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने भरकटलेले आणि मिऱ्या किनारी खडकात अडकलेले हे परदेशी जहाज अखेरीस समुद्रातून बाहेर काढून भंगारात काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मेरिटाईम बोर्डाची आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर, हे जहाज भंगारात काढण्याचा मार्ग मोकळा झाला असून, भंगार विक्रेत्यांकडून ते तोडण्याचे काम सुरू झाले आहे. २०२० साली आलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे हे जहाज भरकटले आणि रत्नागिरीजवळच्या मिऱ्या किनाऱ्यावरील खडकाळ भागात अडकले.
या जहाजाची मूळ किंमत सुमारे ३५ कोटी रुपये आहे. हे जहाज परदेशी होते. गेली पाच वर्षे समुद्राच्या लाटा, खारे पाणी आणि हवामानाचा सामना करत हे जहाज किनाऱ्यावर उभे होते. या काळात जहाजाची कोणतीही डागडुजी किंवा देखभाल न झाल्यामुळे ते मोठ्या प्रमाणात गंजून गेले. काही वर्षांपूर्वी समुद्रातील तुफानी लाटांचा सामना करताना या जहाजाचे दोन मोठे तुकडे झाले होते, तसेच त्याचा काही भाग वाळूत खोलवर रुतला होता. यामुळे हे जहाज समुद्रातून बाहेर काढणे एक मोठे आव्हान बनले होते. पाच वर्षे किनाऱ्यावर अडकल्यामुळे हे जहाज रत्नागिरीतील एक अनोखे पर्यटन स्थळ बनले होते, अनेक पर्यटक केवळ या जहाजाला पाहण्यासाठी आणि त्याच्या पार्श्वभूमीवर फोटो, तसेच रील्स बनवण्यासाठी मिऱ्या किनाऱ्यावर गर्दी करत असत.
सोशल मीडियावर ‘बसरा स्टार’च्या व्हिडिओ आणि फोटोंमुळे ते सर्वदूर प्रसिद्ध झाले होते. या जहाजाची सुटका करण्याची प्रक्रिया अनेक दिवस सुरू होती. मात्र, आता सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे जहाज अवघ्या दोन कोटी रुपयांमध्ये भंगारात काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मेरिटाईम बोर्डाने यासाठी आवश्यक मंजुरी दिल्यानंतर एका भंगार विक्रेत्याने हे जहाज विकत घेतले आहे. विक्रेत्याकडून जहाजाचे भाग तोडण्यास सुरुवात झाली असून, येत्या महिन्याभरात हे संपूर्ण जहाज समुद्रातून बाहेर काढले जाईल, अशी आहे. तब्बल पाच वर्षांनी किनाऱ्यावरील खडकातून या बसरा स्टार’ची सुटका होणार आहे आणि लवकरच हा किनारा पुन्हा पूर्वीसारखा स्वच्छ मोकळा होईल

