वाशिष्ठी डेअरीच्या कृषी महोत्सवाला कोकणवासीयांची अलोट गर्दी होत असून, पशुधनासह पाककला स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. बैलगाडा शर्यतीमधील नामवंत बैलांची छबी टिपण्यासाठी एकच गर्दी होत आहे. अमेरिकन शेळी, परदेशी पोपट, सुंदरी म्हैस, घोडे, टर्की कोंबडा, बकासूर बैल अशा अनेकविध प्राणी प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरले. शहरातील बहादूरशेखनाका येथील सावरकर मैदानावर ५ जानेवारीपासून भव्य स्वरूपात कृषी महोत्सवाला सुरवात झाली. पहिल्या दिवसापासूनच येथे नागरिकांची गर्दी होत आहे. पशुधनमध्ये जास्त दूध देणारी म्हैस आणि गाय सुदृढ निरोगी बैल व रेडा अशा वेगवेगळ्या प्रकारांत ही स्पर्धा पार पडली.
प्रत्येक प्रकारात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र आणि सहभागी सर्व शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रदर्शनास सर्वात कमी उंचीची राधा म्हैस, बैलगाडा शर्यतीमधील विजेता बैल राजा, सोना रेडा, बकासूर बैल, चार किलो वजनाचा कोंबडा, टर्की कोंबडा, परदेशी पोपट, अमेरिकन बकरी, पांढरीशुभ्र उमदे घोडे, वळू, लाल कंधारी जातीच्या गायी, सुंदरी म्हैस असे आगळेवेगळे पशुधन पाहण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली.
महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी ‘चिक्या आणि सर्जा’ तर चौथ्या दिवशी ‘वेगाचा शेवट सर्जा’ या बैलजोड्यांनी कृषी महोत्सवात खास रंगत आणली. एका खास प्लॅटफॉर्मवर ‘चिक्या-सर्जा-वेगाचा शेवट सर्जा’ सर्वांना दर्शन देत होते. या नामवंत बैलजोड्यांची छबी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी गर्दी झाली होती. महोत्सवात गोड व तिखट पाककला स्पर्धा झाली. महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत दर्जेदार पदार्थ बनवले. स्वप्ना यादव यांनी विशेष लक्ष देऊन ही स्पर्धा यशस्वी करून घेतली.

