नगर परिषदेच्या राजकारणात स्वीकृत नगरसेवक पदासाठी महायुतीतील अनेक इच्छुकांना धक्का देत आ. किरण सामंत यांनी नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभूत उमेदवार सुभाष उर्फ बंड्या बाकाळकर यांना उमेदवारीची पसंती दिली आहे. आ. किरण सामंत यांच्या या निर्णयाची आता राजापूरच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नुकत्याच झालेल्या न.प.च्या निवडणुकीत प्रभाग क्र. ४ मधून काँग्रेसकडून निवडणूक लढवून पराभूत झालेले माजी नगरसेवक बाकाळकर यांच्या आकस्मिक निवडीच्या घोषणेने व त्यांच्या शिंदे शिवसेनेतील प्रवेशाने शिवसेनेसह सर्वच पक्षातील लोक आश्चर्यचकित झालें आहेत.
आज निवडणूक – राजापूर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदासाठी मंगळवारी १३ रोजी निवडणूक होत आहे. याच दिवशी दोन्ही गटांतील प्रत्येकी एक अशा दोन स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर केली जाणार आहेत. नगर परिषदेत सत्ताधारी काँग्रेस महाविकास आघाडीने शहर विकास आघाडी म्हणून गटाची नोंदणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे, तर शिवसेना-भाजपाकडूनही आपल्या गटाची नोंदणी करण्यात आली आहे. दोघांकडूनही प्रत्येकी एक-एक स्वीकृत नगरसेवक होणार आहे. यासाठी त्या-त्या गटनेत्यांकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे सोमवारी १२ जानेवारीपर्यंत गटनेत्यांच्या शिफारशीने अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
विनय गुरव उपनगराध्यक्ष – दरम्यान, उपनगराध्यक्षपदासाठी सत्ताधारी राजापूर शहर विकास आघाडीकडून उबांठा सेनेचे विनय गुरव यांचे नाव निश्चित झालेले असताना महायुतीच्या राजापूर शहर शिवसेना शहर विकास आघाडीकडूनही निवडणूक लढवली जाणार अथवा त्यासाठी उमेदवार कोण याबाबत सोम वारी सायंकाळपर्यंत स्पष्टता करण्यात आलेली नव्हती.
शिवलकर स्वीकृत नगरसेवक – महाविकास या दरम्यानच आघाडीकडून शुक्रवारी पत्रकार व राजापूर तालुका ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष महेश शिवलकर यांचे नाव जाहीर करून त्यांच्या नावाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. दरम्यान, मंगळवारी या दोन्ही स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीची घोषणा होणार आहे. शिवसेनेकडून यापूर्वी माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी तसेच शिंदे शिवसेनेत निवडणूक काळात प्रवेश केलेल्या उबाठाच्या माजी नगराध्यक्षा कल्याणी रहाटे यांचे नाव चर्चेत होते. त्यानंतर भाजपाकडून डॉ. शुभम कुशे यांच्या नावाची देखील चर्चा झाली होती. मात्र, यासाठी प्रस्ताव दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सोमवारपर्यंत शिंदे शिवसेनेकडून कुणाचेही नाव जाहीर करण्यात आले नव्हते.

