समुद्रात वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे मासळी स्थलांतरित झाल्याने मच्छीमार नौकांना गेल्या चार दिवसांपासून मासळीच मिळत नाही. खोल समुद्रातही हीच अवस्था आहे. रोजच्या खर्चाइतकीही मासळी मिळेनाशी झाली आहे. उलट वाऱ्यामुळे रापणाचे रोप तुटुन नुकसान होत असल्याचे मच्छीमार सचिन खेत्री यांनी सांगितले. जिल्ह्यात सुमारे ३ हजार ३८७ मच्छीमार नौका आहेत. यातील पर्ससीन किंवा यांत्रिकी नौकासाडेबारा नॉटीकल मैलच्या बाहेरील समुद्रात जाऊन मासेमारी करत आहेत. इतर नौका साडेबारा नॉटीकल मैलच्या आत मासेमारी करत आहेत. परंतु कोणत्याच नौकाना खर्चाइतकीही मासळी मिळेनाशी झाली आहे. दोन-तीन दिवसांसाठी समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या नौकाना अवघे तीन से चार टपच मासळी मिळत आहे. यामध्ये फिशमिल कंपन्यांसाठी लागणारी छोटी मासळी मोठ्या प्रमाणात मिळत आहे.
मासेमारी करणाऱ्या नौकाना इंधन, खलाशांचे रेशन, पाणी भरून देणे त्याचवरोबर खलाशांचे आठवड्याचे पगार देण्याचा खर्च असतो. हा खर्चही सुटत नसल्याचे मच्छिमार खेत्री यांनी सांगितले. उलट समुद्रात वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे रापणाचे रोप तुटण्याचे प्रकार घडून ते रापण जाळे समुद्रातअडकून पडण्याचे प्रकार घडत आहेत. लाखो रुपये किमतीची’ जाळी किंवा रापण यामुळे नादुरुस्त होत आहेत. रोपे तुटून समुद्रात अडकलेली रापण काढण्यासाठीही खर्च करावा लागतो. त्यानंतर त्या जाळ्यांच्या दुरुस्तीचा खर्च असतो. रापणीचा केवळ रोप तुटला तर तो जोडून घेता येतो. परंतु रोप तुटून रापण जाळे समुद्रात अडकले तर मोठे नुकसान होत असते. समुद्रात वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे एकीकडे रापण जाळ्यांचा खर्च वाढत असतानाच मासळीही मिळत नाही. त्यामुळे मच्छीमार आर्थिक अडचणीत येवू लागला आहे.

