शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाची सुनावणी बुधवारी (२१ जानेवारी) सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. खरी शिवसेना कोणाची हे या निकालावर अवलंबून असल्याने या सुनावणीकडे महाराष्ट्राच्या साऱ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण ही निशाणी उद्धव ठाकरेंना मिळाली तर महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ घडेल. शिंदेंच्या शिवसेनेसमोर भाजपामध्ये विलिन होण्याखेरीज अन्य कोणता मोठा पर्याय शिल्लक राहणार नाही असे मत ज्येष्ठ वकिल अॅड. असिम सरोदे यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय काय लागतो याविषयीही उत्सुकता आहे. मात्र दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या हालचालींना महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने आधीच सुरूवात झाल्याने कोणत्याही गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाले तरी फारसा फरक पडणार नाही. कारण हे दोन पक्ष एकत्रित येतील असा अंदाज कायदयाचे अभ्यासक बांधत आहेत.
३ वर्षापासूनचा वाद – शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. गेल्या ३ वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी सुरु आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांचा तर राष्ट्रवादी हा अजित पवारांचा पक्ष असल्याचा निर्णय दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
चिन्ह आणि नाव कोणाला? – राज्यात नुकत्याच नगरपरिषद, नगरपालिका महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणुका लढवल्या. तर उद्धव ठाकरेंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने मशाल चिन्हावर निवडणुका लढवल्या. मात्र आता पुढील सुनावणीत शिवसेना नाव आणि चिन्ह उद्धव ठाकरेंना मिळाल्यास विविध प्रश्न उपस्थित राहतील. या सगळ्या प्रकरणावर अॅड असिम सरोदे यांनी एक्सवर टिट केलं आहे.
असिम सरोदे काय म्हणाले? – शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह.. सुनावणीची तारीख उद्या सुप्रीम कोर्टात आहे. पण ३७ नंबरचे , मॅटर सुनावणीसाठी रीच होणे कठीण आहे. आता लोकांचा नवीन प्रश्न-जर एकनाथ शिंदेंकडून पक्ष चिन्ह व शिवसेना नाव काढून घेतले तर मुंबई महापालिकेत काय होईल? मला वाटते शिंदेसेना भाजपमध्ये विलीन होईल व एकनाथ शिंदे यांचे राजकीय महत्व एकदम कमी होईल. शिंदेसेनेतील अनेकजण उद्धव ठाकरेंकडे स्वगृही परत जातील व मूळ शिवसेना अधिक ताकदवान होईल. उद्धव आणि राज ठाकरे मिळून मुंबई महापालिकेतील राजकारणं फिरवू शकतील. सर्वोच्च न्यायालयातील एका निर्णयामुळे सुरु झालेला खेळ सर्वोच्च न्यायालयाच कधीतरी संपवेल… अस असिम सरोदे यांनी म्हटलं आहे.
गेल्या तीन वर्षांपासून याचिका प्रलंबित – शिवसेना पक्ष आणि या पक्षाचं निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाण कोणाचा, या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. २०२२ साली एकसंध शिवसेनेतून फुटलेल्या एकनाथ यांचा पक्ष हाच खरा शिवसेना पक्ष असल्याच्या आणि त्यांना धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्यास मुभा देणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

