आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटत असल्याचे संकेत मिळत आहेत. मुंबईत भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी रत्नागिरीत स्वतंत्र बैठका घेऊन आपापली रणनीती आखली आहे. शुक्रवारी महायुतीच्या जागावाटपाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे; परंतु भाजपला रत्नागिरीत जिल्हा परिषदेची एकही जागा सेना सोडणार नाही असे चित्र दिसत आहे. उर्वरित रत्नागिरी जिल्ह्यात ९ गट आणि १० गण सोडण्यात येणार आहेत. शिवसेना ४५ जागांवर लढणार आहे. तर राष्ट्रवादीने (अजित पवार गट) चिपळुणात स्वबळाचा नारा दिला आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरीतील बंगल्यावर शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. दुसरीकडे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही मुंबईत रत्नागिरी मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक घेतली. या दोन्ही बैठकांनंतर जिल्ह्यात महायुतीचे जागावाटप जवळपास निश्चित झाल्याचे समजते. येत्या दोन दिवसांमध्ये महायुतीची घोषणा होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. युतीचे जागा वाटप निश्चित झाले आहे. मात्र यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस संगमेश्वर वगळता अन्य ठिकाणी स्वतंत्र लढणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात खऱ्या अर्थाने सेना-भाजपा युती म्हणूनच लढणार असल्याचे जवळ-जवळ निश्चित झाले आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी याला दुजोरा दिला. महायुतीतील जागा वाटपही निश्चित झाले आहे.
जिल्ह्यात भाजपाला एकुण ९ गट आणि १० गण सोडण्यात येणार आहेत. परंतु रत्नागिरीत तालुक्यातील एकही जिल्हा परिषद गठ सेनेने भाजपला सोडलेला नाही. मात्र ३ गण सोडण्यात येणार असल्याचे समजते. त्यामध्ये वाटद, गावखडी आणि हरचेरी गणाचा समावेश आहे. तर शिवसेना एकुण ४५ जिल्हा परिषद तर ७५ पेक्षा पंचायत समिती जागांवर लढणार आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट) आक्रमक झाला आहे. आमदार शेखर निकम यांनी ‘स्वबळा’चा नारा दिला आहे. चिपळूण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गण राष्ट्रवादी स्वबळावर लंढणार असल्याचे समजते. मात्र संगमेश्वरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये असणार आहे. येथे २ गट आणि ६ गण मिळण्याची शक्यता आहे.

