पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू असलेल्या अर्ज छाननीच्या प्रक्रियेत दापोली तालुक्यात वाद निर्माण झाला आहे. कोळबांद्रे जिल्हा परिषद गटातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज अवैध ठरवल्याने राजकीय वातावरण तापले आहे. चुकीचे निष्कर्ष काढून आमच्या उमेदवाराचा अर्ज अवैध ठरवला असून, यास जबाबदार असलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनाच बदलण्यात यावे, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. कोळबांद्रे जिल्हा परिषद गटासाठी कमलाकर आंग्रे (रा. असोंड) यांनी ठाकरे गटाकडून अर्ज दाखल केला होता. कमलाकर आंग्रे असोंड गावचे रहिवासी असून ते १५ जानेवारी २०२६ पर्यंत पोलिसपाटील म्हणून कार्यरत होते. त्यांनी १६ जानेवारीला पोलिसपाटील पदाचा राजीनामा उपविभागीय दंडाधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी यांच्याकडे दिला होता. या राजीनाम्याबाबत प्रांताधिकारी कार्यालयाकडून पोचही त्यांना देण्यात आली आहे. २१ जानेवारीला त्यांनी कोळबांद्रे जिल्हा परिषद गटासाठी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज भरला होता; मात्र गुरुवारी (२२ जानेवारी) झालेल्या अर्ज छाननीवेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी पोलिसपाटील हे लाभाचे पद असल्याने आंग्रे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आल्याचे जाहीर केले.
या निर्णयाला शिवसेना ठाकरे गटाने तीव्र विरोध दर्शवला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना विधानसभा क्षेत्रप्रमुख मुजीब रूमाणे यांनी, आंग्रे यांनी वेळेत पोलिसपाटील पदाचा राजीनामा दिला असताना हेतूपुरस्सर त्यांचा अर्ज अवैध ठरवला आहे. हा निर्णय अन्यायकारक असून, निवडणूक निर्णय अधिकारी काही सत्ताधारी घटकांच्या प्रभावाखाली काम करत आहेत, असा गंभीर आरोप केला आहे. रूमाणे म्हणाले, ‘जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी दोन वेगवेगळे निवडणूक निर्णय अधिकारी असणे आवश्यक असताना येथे दोन्ही निवडणुकांची जबाबदारी एकाच अधिकाऱ्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व प्रक्रिया केंद्रित स्वरूपाची होत असून पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर उघडणे अपेक्षित असताना, मशीन आल्याची माहिती आम्हाला केवळ व्हॉट्सअॅप संदेशाद्वारे देण्यात आली. एवढ्या घाईगडबडीत योग्य निर्णय घेणे शक्य नाही. डॉ. सूर्यवंशी यांना तातडीने बदलून नव्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात येणार आहे.’

