नैसर्गिक उताराने शीळ धरणातून जॅकवेलमध्ये पाणी येण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या ११०० मीटरच्या पाईपलाईनचे काम अखेर ३ वर्षानंतर पूर्ण झाले. सहा फ्लोटिंग पंपाद्वारे शीळ नदीतील पाणी जॅकवेलमध्ये चढविले जात होते. यामुळे दरमहिन्याला २ लाख वीज बिलाचा खर्च पालिकेवर पडत होता. धरणातील पाणी आता थेट जॅकवेलमध्ये नैसर्गिक उताराने येत असल्याने पालिकेवरील हा भुर्दंड कमी झाला आहे. शीळ जॅकवेल कोसळल्यामुळे शहरातील पाणी प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर तात्पुरता पर्याय म्हणून फ्लोटिंग पंप बसविण्यांत आले सुधारित पाणी योजनेमध्ये शीळ धरण ते जॅकवेलपर्यंत सुमारे ११०० मीटरची पाईपलाईनचा समावेश आहे. परंतु ३ वर्षे झाली तरी ही पाईपलाईन टाकण्याच्या दृष्टीने अपेक्षित प्रयत्न झाले नाहीत. पावसाळ्यापूर्वी हा प्रश्न पुन्हा चर्चेला येतो. पावसाळ्यात पूर स्थिती निर्माण झाली तर शीळ नदीवरील फ्लोटिंग पंप वाहुन जाण्याची भिती व्यक्त केली जाते. तसे झाले तर एन पावसाळ्यात शहराचा पाणी प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती.
यामुळे पाईपलाईचे काम लवकरात लवकर व्हावे, अशी अपेक्षा होती. अखेर प्रसार माध्यमांनी हा विषय उचलून धरल्यामुळे पालिकेने ठेकादार नेमुन ११०० मीटरच्या पाईपलाईचे काम पूर्ण करून घेतले आहे. तीन वर्षे रखडलेले हे काम आता पूर्ण झाले आहे. शीळ धरण ते जॅकवर्लेपर्यंत नैसर्गिक उताराने पाणी येते. पालिकेने सुमारे साडे ११०० मीटरची ही पाईपलाइन वेळीच टाकली असती तर पालिकेच अर्थात भुर्दंड बसला नसता. सहा फ्लोटिंग पंप नदीवर बसवून ते पाणी जॅकवेलमध्ये टाकले जाते. यासाठी सहापैकी ४ पंप २४ तास सुरू असतात. तर दोन पंप पर्यायी म्हणून ठेवलेले असतात. या विद्युत पंपांचे महिन्याचे वीज बील सुमारे २ लाख आहे. गेली तीन वर्षे हे पंप सुरू आहेत. म्हणजे साधारण पाऊण कोटी आतापर्यंत पालिकेने बिलापोटी मोजले आहेत. पाईपलाईन टाकली असती हे जनतेचे पैसे वाचले असते.. परंतु आता हे काम झाले आहे.
शीळ जॅकवेलमध्ये ऑपरेटर म्हणून पालिकेचे सहा कर्मचारी कामाला आहेत. ते तीन पाळ्यांवर काम करतात. उन्हाळा, पावसाळा, हिवाळ्यात जॅकवेलच्या इमारतीमध्ये रहावे लागते. या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी तेथे निवारा शेड होती. परंतु अनेक वर्षांपासून या निवारा शेडची अवस्था दयनिय झाली आहे. परंतु त्याच्या दुरूस्तीचा विचार पालिकेने केलेले नाही. आजही हे कर्मचारी वाऱ्यावर आहेत. पाच पंपांच्या कर्कश आवाजात त्यांना आपली ड्युटी बजवावी लागत आहे. त्यामुळे पालिकेने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने नवीन निवारा शेड बांधावी, अशी मागणी आहे. फ्लोटिंग पंपांचा पर्याय अजूनही कायमः फ्लोटिंग पंप शीळ नदीत सुरक्षित रहावे यासाठी ८ वायरूप लावून बांधण्यात आले आहेत. परंतु यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी झाली तर हे पंप रहातील का, अशी भिती अनेकांनी व्यक्त केली आहे. म्हणून पाईपलाईन टाकणे आवश्यक आहे.

