गुलाब चक्रीवादळ काल संध्याकाळी उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडीसामध्ये धडकल्यानंतर चक्रीवादळाचा वेग कमी झाला असून, हे चक्रीवादळ कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतरीत झाले असून हे कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्राकडे पुढे सरकत असल्या कारणाने पुढील २ ते ३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण व विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे हवामानशास्त्र विभागाने रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, धुळे, जळगाव या जिल्ह्यांमध्ये “रेड अलर्ट” जारी केला आहे. तर सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, नांदेड, लातूर, बुलडाणा, वाशिम, उस्मानाबाद, अकोला अमरावती या जिल्ह्यांमध्ये “यलो अलर्ट” जाहीर करण्यात आला आहे.
राज्यात हे दोन दिवस मंगळवार आणि बुधवार गुलाब चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार आहे. त्यामुळे पुन्हा चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. तयार झालेलं हे कमी दाबाचे क्षेत्र, अरबी समुद्राला मिळाल्या नंतर पुन्हा ह्या क्षेत्राचे रुपांतर अती तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये रुपांतर होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाकडून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, जळगावमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे सतर्क राहण्यास सांगितले आहे. या ठिकाणी साधारण २०० मिमीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे.
त्याचप्रमाणे, मुंबई, पुणे, औरंगाबादसाठी ह्या भागामध्ये पावसाची तीव्रता अधिक असणार असून ६४ मिमी ते २०० मिमीपर्यंत अंदाज वर्तवला आहे. दुसरीकडे, समुद्रात वाऱ्यांचा वेग सुद्धा अधिक असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना भारतीय हवामान विभागाकडून जारी करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या कालावधीत सागरी भागात उधाणाची शक्यता असल्याने प्रशासनाने सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.