चिपळूण: सरकारी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गरजू रुग्णांची अडवणूक करून लाच लाटणाऱ्या लाचखोरांना आता कायद्याचा चांगलाच हिसका बसू लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील कामथे उपजिल्हा रुग्णालयात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील वर्ग-१ च्या महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन शिरीष मदार (वय ४८) यांना तब्बल ४ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ अटक केली. एका गरोदर महिलेला गर्भपाताचे किट (गोळ्या) देण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
तक्रारदार महिला गरोदर असून त्यांना काही कारणास्तव गर्भपात करायचा होता. शासकीय नियमानुसार योग्य उपचारासाठी त्यांनी ३ जून २०२६ रोजी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. तिथे त्यांची भेट रुग्णालयाच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन मदार यांच्याशी झाली. मात्र, शासकीय रुग्णालयात मिळणारे उपचार आणि औषधे विनासायास मिळण्याऐवजी, डॉ. मदार यांनी गर्भपाताचे आवश्यक किट देण्यासाठी थेट ४ ते ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
शासकीय डॉक्टरकडूनच अशा प्रकारे पैशांची उघड मागणी झाल्याने तक्रारदार महिलेने या अन्यायाविरुद्ध लढण्याचे ठरवले. त्यांनी तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) रत्नागिरी कार्यालयाशी संपर्क साधून रीतसर तक्रार नोंदवली.
स्वतःच्याच खाजगी कारमध्ये रचला ‘खेळ’, पण…
तक्रार मिळताच एसीबीच्या पथकाने ३ जून रोजी दुपारीच या प्रकरणाची गुपचूप पडताळणी केली. पडताळणी दरम्यान डॉ. कांचन मदार यांनी गर्भपाताच्या किटसाठी साडेचार हजार रुपये मागितल्याचे आणि ते स्वीकारण्यास होकार दिल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर एसीबीने रुग्णालयाच्या आवारातच अत्यंत शिताफीने सापळा रचला.
डॉ. मदार यांना एसीबीच्या छाप्याची पुसटशीही कल्पना नव्हती. त्यांनी रुग्णालयाच्या आवारात उभ्या असलेल्या स्वतःच्या खाजगी चारचाकी गाडीत (क्रमांक MH 08 AX 2618) तक्रारदार महिलेला बोलावले आणि तिथे साडेचार हजारांची रक्कम हातात घेतली. पण, तेवढ्यात दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने झडप घातली आणि पंचांसमक्ष त्यांना लाचेच्या रक्कमेसह रंगेहाथ ताब्यात घेतले. या कारवाईमुळे कामथे रुग्णालय परिसरात आणि संपूर्ण चिपळूण वैद्यकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
एसीबीची धडक कारवाई
सध्या चिपळूणमधील पागमळा येथील परांजपे स्किममध्ये राहणाऱ्या डॉ. कांचन मदार यांच्यावर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही यशस्वी कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे आणि सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तर रत्नागिरी युनिटचे पोलीस उप अधीक्षक अविनाश पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक सुहास रोकडे, मच्छिद्र जाधव, उदय चांदणे, संजय वाघाटे, विशाल नलावडे, दीपक आंबेकर, श्रेया विचारे, हेमंत पवार, राजेश गावकर, समिता क्षीरसागर आणि चालक प्रशांत कांबळे यांनी हा सापळा यशस्वी केला.
लाचेच्या मागणीविरुद्ध आवाज उठवा! जर कोणत्याही सरकारी कार्यालयात तुमचे काम करण्यासाठी अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असतील, तर अजिबात घाबरू नका. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी (ACB) संपर्क साधा.
टोल फ्री क्रमांक: 1064
रत्नागिरी कार्यालय फोन: 02352-222893
मोबाईल क्रमांक: 7588941247 / 9870474535

