संगमेश्वर: रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातून एक मन सुन्न करणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. तालुक्यातील पोचरी गावात एका ३५ वर्षीय नराधमाने घरात कुणीही नसताना, अवघ्या काही वर्षांच्या अल्पवयीन बालिकेच्या एकांताचा गैरफायदा घेत तिच्याशी अश्लील चाळे केले. या धक्कादायक प्रकारानंतर संगमेश्वर पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवत आरोपीला तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत. या नराधमावर पोक्सो (POCSO) आणि नवीन ‘भारतीय न्याय संहिता’ (BNS) अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नेमकं काय घडलं? पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मुकेश मोहन देसाई (वय ३५ वर्षे, रा. पोचरी, मधलीवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
ही घटना सोमवार, १ जून रोजी सकाळी १०:०० ते दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास घडली. पीडित मुलगी पोचरी येथील तिच्या राहत्या घरी एकटीच होती. घरात कोणीही मोठे माणूस नसल्याची खात्री करून आरोपी मुकेश देसाई याने घरात प्रवेश केला. समोर असलेली मुलगी अल्पवयीन आहे, याचे भान न ठेवता त्याने अत्यंत वाईट हेतूने तिला स्वतःच्या मांडीवर बसवले आणि तिच्या शरीराला तसेच गुप्तभागाला स्पर्श करत अश्लील चाळे केले.
आईच्या तक्रारीनंतर पोलिसांची धडक कारवाई या अनपेक्षित आणि भयानक प्रसंगामुळे ती निष्पाप बालिका पूर्णपणे हादरून गेली होती. घडलेला प्रकार समोर आल्यानंतर, पीडित मुलीच्या ३६ वर्षीय आईने तात्काळ पावले उचलली. बुधवार, ३ जून रोजी संध्याकाळी ७:३६ वाजता त्यांनी संगमेश्वर पोलीस ठाणे गाठून या नराधमाविरोधात रीतसर फिर्याद नोंदवली.
घटनेचे गांभीर्य ओळखून संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी तातडीने पोचरी गावात घटनास्थळाला भेट दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवत संशयित आरोपी मुकेश देसाईला तात्काळ अटक केली. आरोपीविरुद्ध संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ६५/२०२६ नुसार, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४ आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) च्या कलम ८ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सुरू या संवेदनशील आणि गंभीर गुन्ह्याची प्राथमिक नोंद महिला सहाय्यक पोलीस फौजदार व्ही. एस. तांबडे यांनी केली आहे. सध्या आरोपी पोलिसांच्या कडक कोठडीत असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक व्ही. डी. साळवी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. अशा घटनांमुळे ग्रामीण भागात लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पोचरी परिसरात या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

