रत्नागिरी सध्या रस्त्यावरील खड्डे, पाईपलाईन ची खोदकामे, वाहनचालकांना होणारा त्रास, पाणी व्यवस्थापन आणि सत्ताधारी या सर्व विषयांवरून गाजतच आहे. सध्या चर्चा सुरु आहे ती, रत्नागिरी मधील सिग्नल यंत्रणा. कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरू असताना दोन वर्षांपूर्वी हे सिग्नल बंद करण्यात आले होते. मारुती मंदिर हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने या ठिकाणी पोलिसांचे कोव्हिड तपासणी सेंटर होते. त्यामुळे मारुती मंदिरसह जेलनाका येथील सिग्नल बंद ठेवण्यात आले होते.
सध्या शहरातील मारुती मंदिर आणि जेलनाका येथील दोन सिग्नल कार्यान्वित झाले आहेत. रत्नागिरी शहरामध्ये १२ वर्षांपूर्वी एकूण सहा ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली. त्यामध्ये जयस्तंभ, जेलनाका, रामनाका, मारुती मंदिर, गोखलेनाका आणि गाडीतळ या सहा ठिकाणी सिग्नल कार्यान्वित करण्यात आलेले. सिग्नलचा टायमिंग कमी ठेवण्यात आल्याने, रस्ते अरुंद असून, चहूबाजूने जाण्यास जागा नसल्याने रामनाका, गोखले नाका इत्यादी गर्दीच्या ठिकाणचे सिग्नल बंद करण्याची मागणी जोर धरू लागली.
सिग्नल संदर्भात अनेक मतांतरे होऊ लागल्याने, लोक प्रतिनिधींनी यामध्ये जातीनिशी लक्ष घातले. ज्याठिकाणी अति गर्दी होते आणि त्रास होतो तेथील सिग्नल बंद करण्यासाठी दबाव वाढू लागला. दरम्यानच्या काळात सिग्नलच्या यंत्रणेमध्ये बिघाडही निर्माण झाला.
दीड वर्षापूर्वी कोव्हिडचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने, संचारबंदी सुरू करण्यात आली. रत्नागिरी तालुक्याच्या मध्यभागी असलेल मारूती मंदिर येथे कोव्हिड तपासणी सेंटर सुरू करण्यात आले. त्यामुळे कोविडच्या पार्श्वभूमीवर मारुती मंदिर आणि जेलनाका येथील सिग्नल यंत्रणा वाहतूक पोलिसांकडून बंद करण्यात आली. आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येऊ लागल्याने मारुती मंदिर आणि जेलनाका येथील सिग्नल सुरू करण्यात आले आहेत.