रत्नागिरी: सणासुदीच्या तोंडावर आणि भरदिवसा घडणाऱ्या चोऱ्यांमुळे रत्नागिरी परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रत्नागिरी तालुक्यातील एमआयडीसी मिरजोळे येथील बहार एक्झिक्युटिव्ह रेल्वे कॉलनीत एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ८ लाख ७३ हजार रुपयांचा ऐवज पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये सोन्या-चांदीच्या मौल्यवान दागिन्यांसह रोकड आणि अमेरिकन चलनाचाही समावेश आहे.
प्रवासात असताना शेजाऱ्यांचा फोन आला अन्…
मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी मिरजोळे येथील बहार बंगला क्र. ५ मध्ये राहणाऱ्या गृहिणी शालिनी शंकर गंजे (वय ५०) या ३१ ऑगस्टच्या मध्यरात्री (सुमारे १२:३० वाजता) आपल्या घराला व्यवस्थित कुलूप लावून काही खाजगी कामानिमित्त जळगाव येथे गेल्या होत्या.
काम आटोपून २ सप्टेंबर रोजी त्या रेल्वेने रत्नागिरीकडे परत येत होत्या. दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांच्या शेजारी राहणाऱ्या वर्षा पाटील यांचा शालिनी यांना अचानक फोन आला. शेजाऱ्यांनी सांगितले की, “तुमच्या घराचे कुलूप तुटलेले दिसत असून मुख्य दरवाजा उघडा आहे आणि आतील सामान अस्ताव्यस्त पडले आहे.” हा फोन ऐकताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.
घरात शिरताच दिसले विस्कटलेले दृश्य
शालिनी गंजे या सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास तातडीने घरी पोहोचल्या. तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्यांना मोठा धक्का बसला. मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला होता. चोरट्यांनी घरातील कपाटांची उचकापाचक करून तिजोऱ्या रिकाम्या केल्या होत्या.
चोरीस गेलेला मुद्देमाल: कपाटाची पाहणी केली असता चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये प्रामुख्याने:
-
सोन्याच्या पाटल्या, बांगड्या, अंगठ्या आणि ब्रेसलेट
-
पारंपरिक राणीहार आणि लक्ष्मीहार
-
कानातील डुल, टॉप्स, सोन्याचे व हिऱ्याचे (डायमंड) मंगळसूत्र
-
७० हजार रुपयांची रोख रक्कम आणि परदेशी चलनातील ५४० अमेरिकन डॉलर्स (USD) असा एकूण मिळून सुमारे ८ लाख ७३ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
ग्रामीण पोलिसांकडून तपास वेगात
या घटनेनंतर शालिनी गंजे यांनी त्वरित पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात भादंविच्या संबंधित कलमांनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून कॉलनी आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे. तसेच श्वानपथक व फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने आरोपींचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

