कोस्टगार्डला जीपीएस् यंत्रणेवर देवगड समुद्रामध्ये चीनी बोटी असल्याचे लोकेशन मिळाले. मागील दोन- तीन दिवस या नौका देवगड समुद्रामध्ये फिरत असल्याचे समजल्यानंतर तात्काळ याबाबतची माहिती मत्स्य व्यवसाय व पोलिसांना देण्यात आली. दरम्यान मत्स्यव्यवसाय विभागाकडे गस्तीनौका नसल्याने सागर पोलिस विभागाची या प्रकारणी मदत घेण्यात आली.
देवगड समुद्रात चीनी बोटींचा वावर असल्याचे कोस्टगार्डच्या जीपीएस् लोकेशनमध्ये निदर्शनास आल्याने सुरक्षा यंत्रणा खडबडून जागी झाली. कोस्टगार्डने \फिशरीज, पोलिस यंत्रणेला संशयित चीनी बोटींचा शोध घ्या अशा सुचना दिल्या व दोन्ही यंत्रणा कामाला लागली. सागर पोलिस विभागाने गस्तीनौकेने शोध मोहिम सुरु केल्यानंतर गिर्ये समुद्रात चायनीज व्हीटीएस् यंत्रणा असलेली बोट सापडली मात्र ही बोट रत्नागिरी येथील असल्याचे निष्पन्न झाले असून, पुढील तपास आणि कारवाईसाठी देवगड बंदरात आणून मत्स्यव्यवसाय विभागाकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
नौकांचा शोध घेण्यासाठी सागर सुरक्षा देवगड शाखेची टीम सागरकन्या गस्ती नौकेने समुद्रात रवाना झाली. या टीममध्ये सागरी सुरक्षा विभागाचे पोलिस उपनिरिक्षक जितेंद्र साळूंखे, विशाल कराळे, तेली, पोलिस नाईक तांबे, पो.कॉ.निलेश पाटील यांचा समावेश होता.
रत्नागिरीतील साखरकर यांच्या नौकेवर चीनी कंपनीची व्हीटीएस् यंत्रणा बसविण्यात आली आहे, मात्र या यंत्रणेचे भारतीय रजिस्ट्रेशन करण्यात न आल्याने ही नौका चीनमधील असल्याचे लोकेशन जीपीएस् यंत्रणेवर दाखवले जात होते. भारतीय रजिस्टेशन न केल्यामुळे चीनची नौका असल्याची माहिती यंत्रणेला प्राप्त झाल्याने खळबळ उडाली दरम्यान ही नौका भारतीय असल्याचे निष्पन्न झाल्याने सुरक्षा यंत्रणेनेही सुटकेचा निश्वास सोडला.