लांजा: धावपळीच्या आणि दगदगीच्या दैनंदिन जीवनातून काही क्षण निसर्गाच्या सान्निध्यात शांततेचे मिळावेत, लहान मुलांना बागडण्यासाठी हक्काची जागा असावी आणि ज्येष्ठांना निवांत फेरफटका मारता यावा, यासाठी लांजा शहरात आता एक देखणे पर्यटन व विरंगुळा केंद्र उभे राहत आहे. शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या या महत्त्वाकांक्षी ‘नमो उद्यान’ प्रकल्पाचे रविवारी आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात भूमिपूजन पार पडले. हा भव्य प्रकल्प तब्बल १ कोटी रुपये खर्चून साकारला जाणार आहे.
आरोग्य आणि विरंगुळ्याचा सुंदर मेळ
लांजा शहराचा वाढता विस्तार आणि नागरिकांची गरज लक्षात घेऊन एका सुसज्ज उद्यानाची मागणी बऱ्याच काळापासून होत होती. नागरिकांना सकाळ-संध्याकाळ मोकळ्या हवेत व्यायाम करता यावा, चालण्यासाठी प्रशस्त ट्रॅक मिळावा आणि कुटुंबीयांसोबत काही आनंददायी क्षण घालवता यावेत, या उद्देशाने या ‘नमो उद्यान’ची आखणी करण्यात आली आहे. हिरवेगार लॉन, आकर्षक फुलझाडे, लहान मुलांसाठी खेळणी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विश्रांतीची जागा अशा विविध आधुनिक सुविधांनी हे उद्यान नटणार असून, भविष्यात हे लांजावासीयांचे एक प्रमुख आकर्षण ठरेल.
“लांजाचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास” – आ. किरण सामंत
भूमिपूजन प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना आमदार किरण सामंत यांनी शहर विकासाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “प्रत्येक लांजावासीयाला अभिमान वाटेल, अशा भव्य आणि निसर्गरम्य पद्धतीने हे नमो उद्यान विकसित केले जाईल. लांजाच्या शहरीकरणाला गती मिळत असताना नागरिकांना उत्तम नागरी सुविधा देणे ही आपली प्राथमिकता आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेली सर्व विकासकामे टप्प्याटप्प्याने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
सोहळ्याला मान्यवरांची मोठी उपस्थिती
या भूमिपूजन सोहळ्यास लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. सावली कुरूप, उपनगराध्यक्ष मिलिंद (बाबा) लांजेकर, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजीत कुंभार आणि गटनेते योगेश कावतकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
याशिवाय शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील (राजू) कुरूप, लांजा तालुका प्रमुख गुरू प्रसाद देसाई, जिल्हा बँकेचे संचालक महेश (मुन्ना) खामकर, पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, जयवंत शेट्ये, नगरसेवक वैभव जोइल, गुल्ल्या नेवरेकर, सचिन डोंगरकर, रवींद्र नागरेकर, सुधाकर कांबळे, प्रकल्पाचे कंत्राटदार गणी मुल्लानी यांच्यासह नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्यानाच्या कामाला लवकरच गती मिळणार असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

