एअर इंडियाचे नवे मालक टाटा सन्स होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. परंतु, टाटा सन्सकडून अद्याप अशी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. टाटा सन्सने एअर इंडियासाठी लावलेली बोली जिंकली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता एअर इंडियाचे हक्क टाटा समूहाला मिळणार आहेत. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या पॅनलकडून टाटा ग्रूपची निवड करण्यात आली आहे.
यापूर्वी २०१८ मध्ये सरकारने कंपनीतील ७६ टक्के भागविक्री करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यावेळी अतिशय अल्प प्रतिसाद मिळाला होता. सरकारी कंपनी एअर इंडिया पुन्हा एकदा टाटा समूहाचीच होणार आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, एअर इंडियासाठी २ कंपन्यांमार्फत बोली लावण्यात आली होती. पण ती टाटा समूहाने जिंकली आहे.
टाटा ग्रुप आणि स्पाइसजेट कंपनीने एअर इंडिया विकत घेण्यासाठी बोली लावल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, हि सरकारची दुसरी वेळ आहे जेव्हा सरकार एअर इंडियामधील आपला हिस्सा विकण्याचा प्रयत्न करत आहे. एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी सरकारने गेल्या आठवड्यात टाटा समूह आणि स्पाइसजेटच्या संस्थापकाकडून प्राप्त झालेल्या आर्थिक बोलींचे मूल्यांकन करण्यात आले होते.
तब्बल ६७ वर्षांनंतर एअर इंडिया टाटा समूहामध्ये परत येणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत. ऑक्टोबर १९३२ मध्ये टाटा समूहाने, टाटा एअरलाईन्स म्हणून एअर इंडियाची स्थापना केली होती. परन्तु, १९५३ मध्ये सरकारने विमान कंपनीचे राष्ट्रीयीकरण केले. आता सरकारी मालकीच्या राष्ट्रीय विमानसेवेतील सरकार आपला १०० टक्के हिस्सा विकत आहे, ज्यात एअर इंडिया लिमिटेडमध्ये एअर इंडियाचा १००% हिस्सा आणि एअर इंडिया सॅट्स एअरपोर्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचा ५०% एवढा हिस्सा आहे.