HomeRatnagiriसंगमेश्वर: कडवई धरणाला गळती, लाखो लिटर पाणी वाया; परिसरात तीव्र पाणीटंचाईची भीती

संगमेश्वर: कडवई धरणाला गळती, लाखो लिटर पाणी वाया; परिसरात तीव्र पाणीटंचाईची भीती

गेल्या चार वर्षांपासून मुख्य भिंतीतून पाण्याचा विसर्ग; दुरुस्तीवर लाखो रुपये खर्चूनही गळती कायम असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप.

संगमेश्वर: संगमेश्वर तालुक्यातील ज्या धरणाने गेल्या पाच दशकांपासून परिसराला पिण्याच्या पाण्याचा आधार दिला आणि हजारो कुटुंबांसाठी ‘जलसंजीवनी’ ठरले, ते कडवई येथील लघुपाटबंधारे विभागाचे धरण सध्या स्वतःच मोठ्या संकटात सापडले आहे. गेल्या चार वर्षांपासून या धरणाच्या मुख्य भिंतीतून आणि सांडव्याच्या भागातून पाण्याचा विसर्ग (गळती) सतत सुरू असून, यंदा पावसाने ओढ दिल्याने भविष्यात संगमेश्वर परिसराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची भीती व्यक्त होत आहे.

५० वर्षांची जलसंजीवनी, पण आता पाण्याची नासाडी

जलसंपदा विभागाच्या दक्षिण रत्नागिरी लघुपाटबंधारे विभागांतर्गत येणारे कडवई धरण हे परिसरासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ५.५० चौरस किलोमीटर पाणलोट क्षेत्र, २६५ मीटर लांबी, २५.५० मीटर उंची आणि २४.२९ हेक्टर बुडीत क्षेत्र असलेल्या या धरणामुळे परिसरातील विहिरींच्या भूजल पातळीत लक्षणीय वाढ झाली होती. पिण्याच्या पाण्याचा आणि शेती-वापराचा प्रश्न या धरणामुळे कायमस्वरूपी मार्गी लागला होता. मात्र, गेल्या काही वर्षांत देखभालीअभावी लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने गावकरी हवालदिल झाले आहेत.

दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च, तरीही गळती ‘जैसे थे’

गेल्या चार वर्षांपासून धरणाच्या मुख्य भिंतीला आणि सांडव्याच्या तोंडाशी लागलेली ही गळती रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाने लाखो रुपयांच्या निविदा काढून विविध कामे केली. परंतु, ही सर्व मलमपट्टी निष्फळ ठरल्याचे चित्र आहे. मागील काही वर्षांत समाधानकारक पाऊस झाल्याने पाण्याची कमतरता भासली नाही; मात्र यंदा पर्जन्यमान सरासरीपेक्षा खूपच कमी झाल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. धरणात आधीच अपुरा जलसाठा असताना, दुसरीकडे गळतीमुळे दररोज पाणी वाहून जात आहे.

विशेष म्हणजे, धरणाच्या सांडवा परिसरात प्रचंड प्रमाणावर रानटी झाडीझुडपे वाढली आहेत. त्यामुळे नेमकी किती पाण्याची गळती होत आहे, याचा प्राथमिक अंदाज घेणेही कठीण झाले आहे.

ग्रामसभेत संताप; प्रशासनाची सारवासारव

नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेत कडवईतील ग्रामस्थांनी या गंभीर मुद्द्यावर जोरदार आवाज उठवला. महिनाभरापूर्वी एका राज्यस्तरीय दुष्काळ समितीनेही या धरणाची पाहणी केली होती.

या संपूर्ण परिस्थितीबाबत पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता चंद्रकांत धामापूरकर यांनी स्पष्ट केले की, दोन वर्षांपूर्वी गळती थांबवण्याचे प्रयत्न झाले होते, मात्र ते अपेक्षेप्रमाणे पूर्णपणे यशस्वी झाले नाहीत. सध्या तात्काळ पाणीटंचाई उद्भवणार नाही, असा दावा प्रशासनाने केला असला तरी उन्हाळ्यात पाण्याच्या वापरावर निर्बंध घालावे लागतील, अशी कबुली त्यांनी दिली आहे. तसेच सांडव्यावरील झाडी लवकरच साफ केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

दुसरीकडे, ग्रामाधिकारी राहुलकुमार चौधरी यांनी माहिती दिली की, ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून ग्रामपंचायतीने लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना तातडीने लेखी पत्र दिले आहे. पावसाळ्याअभावी निर्माण झालेली परिस्थिती पाहता, प्रशासनाने वेळ न दवडता युद्धपातळीवर ही गळती थांबवावी, अन्यथा संपूर्ण परिसराला भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागेल, असा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular