सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी येथील विमानतळाचा लोकार्पण सोहळा शनिवार दि. ९ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्यात केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे मुंबईहून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, खा.विनायक राऊत, आ. दीपक केसरकर, आ. वैभव नाईक, आ. नितेश राणे इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होतीत.
आयआरबी, एमआयडीसी विभागाने उद्घाटनाची तयारी जोरदार केली आहे. आजच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग विमानतळ व परिसरामध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
चिपी विमानतळा वरून विमानानं टेक ऑफ घेण्याआधीच माझं मन उंच आकाशात विहरू लागलं आहे, असं म्हणतानाच चिपी विमानतळ झालं, आता सिंधुदुर्गात आंतरराष्ट्रीय दर्जाचं “सी वर्ल्ड” प्रकल्पही लवकरच साकारणार असल्याचं राणेंनी जाहीर केलं आहे. त्याचबरोबर विजयदुर्ग आणि रेडी या दोन बंदराच्या विकासालाही चालना देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. या विकासाच्या कामामध्ये कोणीही अडथळे आणू नयेत.
पुढे बोलताना नाम. राणे म्हणाले, कोकणामध्ये कोणीही गरीब राहू नये असं मला मनापासून वाटतं. कोकणातील तरुणांना रोजगार मिळावेत, घरोघरी पैसा जवळ असावा अशी माझी इच्छा आहे. त्याच्या आड कोणी येऊ नये. चालत्या गाडीला खीळ घालण्यापेक्षा एवढीच खुमखुमी असेल तर काहीतरी सकारात्मक कर्तृत्व करून दाखवावं. हायवे पासून विमानतळापासूनच्या एप्रॉच रोडसाठी ३४ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असून, ते अजून मिळालेले नाहीत. तो निधी मंजूर करून आणून विरोधकांनी आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवावं. विमानतळाला एमआयडीसीने वीज, पाणी पुरवणं गरजेचं आहे, ही कामे अजुनही पूर्णत्वास गेलेली नाहीत. तिथे लक्ष घालावं, असं सूचक आव्हान नारायण राणेंनी केलं आहे.