रत्नागिरी भाटये येथील हसनैन ही बोट देवगड -गिर्ये कालवशी किनाऱ्या समोरील समुद्रात मासेमारीला गेली असताना खडकावर आदळल्याने तिला भेगा पडून, पाण्यात उलटून बुडाल्याची घटना घडली आहे. या बोटीवर असलेल्या २४ खलाशांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात यश मिळाले आले.
प्राप्त माहितीनुसार, रत्नागिरी भाटये येथील अजीम होडेकर यांच्या मालकीची हसनैन ही बोट पहाटेच्या सुमारास गिर्ये पवनचक्की समोरील कालवशी किनाऱ्यालगत मासेमारी करीत असताना अचानक खडकावर आदळल्याने पाण्यातच उलटी झाली, त्यावेळी बोटीवर सुमारे २४ खलाशी होते. त्यांनी सदर बोट बुडत असल्याचे लक्षात येताच मालक अजीम होडेकर यांना तत्काळ माहिती दिली. तसेच जव वाचविण्यासाठी बोटीवर असलेल्या छोट्या होडीचा आधार घेतला.
बोटीनजीक मासेमारी करत असलेल्या रत्नागिरीतील बोटींना याची तात्काळ माहिती दिल्यामुळे त्यांनी या बोटीवरील खलाशांना वाचवले. हसनैन ही बोट रत्नागिरी येथील शेख अहमद यांच्या नावे असून ती भाटये येथील अजीम होडेकर यांनी विकत घेतली असल्याचे समजले. हसनैन बोट खडकात फसलेली असल्याने बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु होते. त्याचप्रमाणे मासे पागायची बोटीवरील जाळी काढण्याचाही प्रयत्न करण्यात आला. बोटीचे जरी नुकसान झाले असले तरी, बोटीवरील सर्व खलाशी सुखरुप असल्याने होडेकर यांनी समाधान व्यक्त केले.
पुढे बोलताना अजीम होडेकर म्हणाले, पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास बोट बुडत असल्याबाबत खलाशांनी मला माहिती दिली. बोट खडकावर आदळल्याने बोटीला भेगा गेल्या. त्यामुळे बोटीमध्ये पाणी शिरु लागले आणि हाहा म्हणता, पाण्याचे जास्त वेग घेऊन बोट एका बाजूने पाण्यात बुडत गेली. बोटीवर खलाशांनी प्रसगांवधान राखत छोट्या होडीचा आधार घेतला. जेव्हा मदतीसाठी इतर रत्नागिरीतील बोटी आल्या तेव्हा या खलाशांना बोटीवर घेण्यात आले. पाण्याला करंट असल्याने बोट किनाऱ्यावर आणण्यास खूप अडथळे निर्माण होत होते.