दरवर्षी शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात येतं. या मेळाव्याला मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक हजर असतात. मात्र सध्या असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षी हा मेळावा ऑनलाइन पद्धतीने भरवण्यात आला होता. यंदाच्या वर्षी मात्र हा दसरा मेळावा ऑफलाइन पद्धतीने म्हणजे कोरोना निर्बंधांचे पालन करून प्रत्यक्षात होणार आहे. यंदाची जागा मात्र बदलली असून ती जागा यावेळी शिवतीर्थ नव्हे तर वेगळीच आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यंदाच्या दसरा मेळाव्याच्या जागेबद्दल माहिती दिली आहे. दसरा मेळावा यंदा मुंबईमधील षण्मुखानंद सभागृहामध्ये केवळ ५०% उपस्थितीमध्ये घेण्यात येणार आहे. या मेळाव्याला मुंबईतले शिवसेनेचे वरिष्ठ नेते, मंत्री, उपनेते, महापौर, काही नगरसेवक, आमदार उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी अगदी बाळासाहेबांच्या काळापासून, शिवाजी पार्क मैदानावर यापूर्वीचे दसरा मेळावे होत असत. मात्र गेल्या वर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे हा दसरा मेळावा ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला. तर यंदा केवळ ५० टक्के उपस्थितीत हा मेळावा साजरा करण्यात येणार आहे.
शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री रामदासभाई कदम यांच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे जुने विरुद्ध नवे असा शिवसेना वाद पुन्हा चव्हाट्यावर आला असून या वादावर मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, या सर्व प्रकरणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलेच चिडले असून, रामदास भाईंवर पक्षांतंर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची देखील चर्चा होत आहे. रामदास कदमांच्या “त्या” व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे पक्षाची बदनामी होत असल्याची भावना देखील शिवसेनेच्या काही नेत्यांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळे यंदाच्या दसरा महामेळाव्याला रामदास कदम यांना एंट्री असेल कि नसेल याबाबत कुजबुज सुरु आहे.