आरोग्य विभागाच्या पुनर्नियोजित परीक्षेमध्ये न्यासा कंपनीने पुन्हा गोंधळ घातला आहे. २४ ऑक्टोबरला दोन सत्रामध्ये परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. पेपर दोन सत्रात घेतले जाणार आहेत. पण अशावेळी सकाळी परीक्षा एका जिल्ह्यात आणि दुपारी परीक्षा दुसऱ्या जिल्ह्यात अशी केंद्र उमेदवारांना देण्यात आली आहेत.
उमेदवारांनी परीक्षेसाठी निवडलेलं केंद्र न देता त्यांना कुठेतरी लांबची केंद्र त्यांना देण्यात आली आहेत. काही उमेदवारांची एका पदाची परीक्षा देण्यासाठी २ जिल्ह्यामध्ये नावे आली आहेत, तसंच एकाच वेळेला सदर परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकणार आहेत. एका उमेदवाराला तर ३ परीक्षांसाठी ३ वेगवेगळ्या जिल्ह्य़ात हॉल तिकीट देण्यात आले आहे. एकूण ८ लाख परीक्षार्थी या परीक्षेसाठी बसत आहेत. मात्र मागच्या वेळेप्रमाणेच उडालेल्या सावळ्या गोंधळामुळे अनेक परीक्षार्थींचं भवितव्य अंधकारामय झालेलं दिसत आहे.
याआधीही सेम प्रकार घडला आहे. राज्यातील आरोग्य सेवक पदाच्या भरतीसाठी लेखी परीक्षेच्या वेळी, १ दिवस आधी परीक्षा रद्द करण्यात आली. या परीक्षेच्या निमित्ताने आरोग्य विभागाचा नियोजनशून्य कारभार पुन्हा जगासमोर आला आहे. महाराष्ट्रातील परीक्षेला बसलेल्या एका विद्यार्थ्याला परीक्षा केंद्र चक्क उत्तर प्रदेशमध्ये दिले गेले. त्यामुळे त्याला धक्का बसला. महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाकडूनही परीक्षा घेण्यात येत आहे. मात्र, दुसऱ्या राज्यात परीक्षा केंद्र मिळाल्याने नक्की हा काय प्रकार आहे ! , असा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन पुन्हा गोंधळ निर्माण झाला आहे. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला चांगलेच फटकारले आहे. त्यांनी परीक्षा घेणाऱ्या कंपन्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी नाहक खेळत आहेत, असे म्हटले आहे. एकाच दिवशी दोन परीक्षा ठेवल्यानं परीक्षार्थींना विनाकारण एका परीक्षेला मुकावं लागणार आहे. शासनाने संबंधित कंपनीला त्वरित आदेश देऊन परीक्षा केंद्र वेळीचबदलून देण्याची मागणी रोहित पवार यांनी केली आहे. जेणेकरून परिक्षार्थीना कोणत्याही परीक्षेला मुकावे लागणार नाही.
त्याचप्रमाणे सगळ्या परीक्षा MPSC मार्फतच घेण्यात याव्यात अशी मागणी आम. रोहित पवार यांनी केली आहे. त्यावेळी सगळ्या परीक्षार्थींना एसटीचा प्रवास मोफत करु देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. आम. रोहित पवार यांनी सरकारकडे आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या गोंधळावरुन काही महत्वाच्या मागण्या केल्या आहेत.