आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाची विमान प्रवास किंवा हेलिकॉप्टरमधून प्रवास करण्याची इच्छा असते. मात्र, गरीब आणि ज्यांची आर्थिक स्थिती बेताची आहे, त्यांच्यासाठी हे केवळ स्वप्नवतच असते. असंच स्वप्न फुटपाथवर राहणाऱ्या दोन चिमुकल्यानी पाहिलं होतं आणि ते पूर्ण देखील झाले आहे.
रवी वेलपट्टी आणि अंजली मोडेम ही दोघजण नालासोपारा रेल्वे स्टेशन परिसरामध्ये फुटपाथवर राहतात. आपल्या हातात मिळेत ते काम करतात, प्रसंगी भीक मागून आपला उदरनिर्वाह देखील करत असतात. एके दिवशी या दोघांचे संभाषण नालासोपारा इथे राहणाऱ्या यश माने याने ऐकले आणि तो भारावून गेला. “ए दादा, आपल्याला हेलिकॉप्टरमध्ये कधी बसायला मिळणार, आपल्याला हेलिकॉप्टरमध्ये कोण बसवणार? असा प्रश्न त्यांनी केला! त्यांचे हे संभाषण ऐकून यश माने या तरुणाने त्यांना हेलिकॉप्टर सफर घडवण्याचं मनाशी ठरवल.
नालासोपाऱ्यातील यश माने या तरुणाने आपल्या स्वत:च्या खर्चाने या दोन्ही मुलांना हेलिकॉप्टरची सफर घडवून आणली आहे. त्यानंतर या दोघांना १४ ऑक्टोबर रोजी हेलिकॉप्टर सफर घडवली. दुपारच्या सुमारास मुंबईच्या विलेपार्ले येथून प्रयाण करून मुंबई, ठाणे, वसई-विरार या परिसरामध्ये हवाई सफऱ घडवून आणली. दोघांचे हवाई सफर करण्याचं स्वप्न पूर्ण झाल्याने त्यांना प्रचंड आनंद झाला आहे.
यश माने या तरुणाने आपल्या स्वखर्चाने दोघांचे स्वप्न पूर्ण केलं आहे. ही पहिलीच वेळ नाहीये ज्यावेळी यश माने याने अशा प्रकारे एखाद्याचे स्वप्न पूर्ण केलं आहे. यापूर्वी देखील यश माने याने गरीब मुलांना आपल्या स्वत:च्या खर्चाने हेलिकॉप्टर सफर घडवून आणली आहे.
यश माने या तरुणाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. हेलिकॉप्टर सफर घडवून आणल्यावर या दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय होता. मुलांनी प्रतिक्रिया देत झालेला आनंद व्यक्त केला. हेलिकॉप्टर प्रवास करुन आम्हाला खूपच चांगले वाटले, आम्ही हेलिकॉप्टर आकाशात असताना पाणी, डोंगर आणि बरंच काही पाहिलं अशा निरागस प्रतिक्रिया लहानग्यांनी दिल्या.