रत्नागिरीतील सगळेच महामार्गांची अवस्था दयनीय झाली असून, त्याची वेळीच डागडुजी करणे गरजेचे बनले आहे. आंबा घाट मागील काही महिन्यांपासून चालू बंद परिस्थितीत आहे. जुलैला झालेल्या अतिवृष्टीचा फटका या घाट मार्गाना चांगलाच बसला आहे. त्याला पर्यायी मार्ग म्हणून वाहतूक अणुस्कुरा घाटातून सुरु करण्यात आली. मात्र काही दिवसामध्येच त्या रस्त्याची एवढी दयनीय अवस्था झाली कि, दुचाकीने सुद्धा त्यावरून प्रवास करणे कठीण बनले आहे.
शारीरिक नुकसान पोहोचते ते वेगळेच अधिक वाहनांचे नुकसान सुद्धा मोठ्या प्रमाणात होते आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राजापूर तालुक्यातील ओणी-पाचल-अणुस्कूरा रस्त्याच्या दुरावस्थेची शासन आणि प्रशासन जाणूनबुजून दखल घेत नसल्याने सोमवारी महामोर्चा काढण्यात आला. येत्या ८ दिवसांमध्ये रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांनाच डांबून ठेवू, असा इशाराच मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी दिला आहे.
राजापूर ओणी, पाचल, अणुस्कूरा रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पितृपक्षात या खड्ड्यां विरोधात मनसेने खड्ड्यांचे पिंडदान व मुंडण करून निषेधही नोंदवला होता. यानंतरही दुरूस्तीबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे मनसेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी सोमवारी जवळेथर फाटा ते पाचल बसस्थानक असा महामोर्चा काढला. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सौंदळकर यांनी येत्या आठ दिवसांत रस्त्याचे काम सुरू न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडून ठेवण्याचा इशारा दिला. तर मनसे विद्यार्थी सेना राज्य उपाध्यक्ष मनिष पाथरे यांनी रस्त्याची दुरूस्ती झाली नाही, तर लोकप्रतिनिधींना याठिकाणी फिरू देणार नाही, असा इशारा दिला.
यावेळी महाराष्ट्र कामगार सेना जिल्हा चिटणीस सुनील साळवी, जिल्हा संघटक रूपेश जाधव, काजिर्डा सरपंच अशोक आर्डे, संपर्क अध्यक्ष दत्ता दिवाळे, उपतालुकाध्यक्ष मंगेश नारकर, विभाग अध्यक्ष मंदार राणे, संतोष काजारी, समीर गुरव, प्रदिप काणेरी, विलास बाणे, राकेश काणेरी, सतीष खामकर, संजय जड्यार, पुरूषोत्तम खांबल, अमित चिले, पमोद इंगळे, परिसरातील महिला ग्रामस्थ यांच्यासह राजापूर, संगमेश्वर, लांजातील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.