मागील कित्येक महिन्यांपासून रत्नागिरीतील रस्त्यांचे काम रखडलेले असून, आता मात्र संयमी असणाऱ्या रत्नागिरीकरांचा संयम सुटत चालला आहे. अनेक आंदोलने झाली, अनेक गोष्टी झाल्या परंतु, प्रशासनाचा व्यवहार जैसे थे. अनेक दिवस रत्नागिरी शहरातील सर्वच रस्त्यांची पार दुर्दशा झालेली आहे. पाणी गळती सुरू आहे. फक्त कोटिंचा निधी मंजूर झाला, काम सुरू आहे, असे दिखावा केला जात आहेत. पण काम मात्र काहीही दिसत नाही. लोकांच्याही आता संतप्त भावना बाहेर निघत आहेत.
रस्त्याची दुरवस्था पाहून, आज भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात धडकले. भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी आज नगरपरिषद प्रशासनाला सज्जड इशाराच दिला आहे. ते म्हणाले कि, आमची सहकार्याची भूमिका आहे. पावसात काम होऊ शकत नव्हते. पण आम्ही संयमी आहोत म्हणून सहनशीलतेचा अंत पाहू नका. अन्यथा आम्ही रस्त्यावर आंदोलन करू. रस्त्यात नुसत डबर टाकून काम होणार नाही. कामाचा वेगही दिसून येऊ दे.
एक दिवस काम सुरु दिसले की पुढचे आठ दिवस काम बंद स्वरुपात असते. हे काम कधी पूर्ण होणार! एवढे बेफिकिर पालिका प्रशासन पाहिलेले नाही अशा कठोर शब्दात त्यांनी सुनावले. जर चार दिवसांमध्ये मुख्य रस्त्यांचे तातडीने पॅचवर्क झाले नाही तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. त्यामुळे भाजपने आज नगरपरिषदेवर धडक मारली. भाजप शिष्टमंडळाने मुख्याधिकारी प्रशांत बाबर यांची भेट घेऊन आज रस्ते, गटारे, पाणीयोजनेच्या अपूर्ण कामांचा पंचनामा केला. त्यानंतर तत्काळ कार्यवाही करा, उद्या सकाळी कामांची यादी कागदावर द्या, अशी सूचना मुख्याधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिली.
मुख्य रस्त्याचे पॅचिंग चार दिवसात झालेच पाहिजे. पाणी योजना व रस्त्याचा ठेकेदार काम करत नसेल तर प्रशासन काय करते, जोडण्याची कामगिरी सुरू असल्याचे सभागृहात सांगितले जाते. पण प्रत्यक्षात काम सुरू नसल्याचे दिसत असल्याचा आरोपही राजू तोडणकर यांनी केला.
या वेळी भाजपाचे पदाधिकारी नगरसेवक उमेश कुळकर्णी, बाबू सुर्वे, प्राजक्ता रुमडे, राजश्री मोरे, नगरसेविका प्रणाली रायकर, सुप्रिया रसाळ, दादा ढेकणे, प्रवीण रायकर, राजेंद्र पटवर्धन, पमु पाटील, नितीन जाधव, योगेश हळदवणेकर, प्रवीण देसाई, विक्रम जैन आदींसह अनेक जण उपस्थित होते.