कोरोना काळामध्ये स्पर्धा परीक्षांसाठी वर्षभर जाहिरात प्रसिद्ध न झाल्यामुळे वयाच्या निकषात बसू न शकणाऱ्या उमेदवारांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. यंदा होणाऱ्या परीक्षांसाठी वयोमर्यादा शिथिल करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला आहे.
राज्य लोकसेवा आयोग व निवड मंडळांच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना एक वर्षाची वयोमर्यादा वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील परीक्षार्थींना मोठा दिलासा मिळाल्याचे सामान्य प्रशासन खात्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
कोरोना काळात गेले वर्षभर नोकर- भरतीसाठी स्पर्धा परीक्षांच्या जाहिराती निघाल्या नाहीत. त्यामुळे या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांची वयोमर्यादा उलटून गेली होती. त्यामुळे किमान दोन वर्षांची वयोमर्यादा वाढविण्याची मागणी राज्यभरातून केली जात होती. या पार्श्वभूमीवर पुढील काळात नोकर भरतीसाठी होणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी उमेदवारांना वयोमर्यादा वाढवून द्यावी, जेणेकरून त्यांना अतिरिक्त संधी मिळू शकेल, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी १३ ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत केली होती.
गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे राज्यातील सर्व महत्त्वाच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. यासोबतच MPSC ची परीक्षाही रद्द झाली होती. त्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेला बसण्यापासून मुकणार होते. मात्र अशा विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून दिलासाजनक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य मंत्रिमंडळाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसण्यासाठी एक वर्षाची मुदत वाढ देण्याचा घेतलेला निर्णय अनेक जणांसाठी लाईफसेव्हर ठरला आहे. येत्या १९ नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असलेल्या परीक्षेसाठीही हा निर्णय लागू असणार आहे. अनेक विद्यार्थ्यांची ही मागणी होती, त्यानुसार सरकारने हा निर्णय घेतला आहे.कोरोनामुळे परीक्षा होऊ न शकल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेला बसण्यापासून मुकणार होते त्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.