जंगलांची मोठ्या प्रमाणात तोड होत असल्याने वन्य हिंस्र पशु आता वाडीवस्तीत यायला लागले आहेत. अनेक गावांमध्ये बिबटे, वाघाचे दिवसा सुद्धा दर्शन घडत आहे. आपली भूक मिटविण्यासाठी ते माणसांवर, पाळीव प्राण्यांवर भरवस्तीत येऊन हमला करायला लागले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यासह आजू बाजूच्या अनेक जिल्ह्यांमध्ये या घटना सर्हास घडताना दिसून येत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ गोवेरी येथे दुर्मिळ मानला जाणारा काळा बिबट्या अर्थात ब्लॅक पँथर सापडला. पाण्याच्या टाकीत पडलेल्या या सुमारे दोन वर्षाच्या काळ्या बिबट्याला वनविभागाने सुरक्षित बाहेर काढले. भक्ष्याच्या मागे धावत असताना तो विहिरीत पडला असावा, असे वन विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
गोवेरी येथे तुकाराम राऊळ यांच्या आंबा-काजू बागेत सिंचनासाठी बांधलेल्या ७ ते ८ फूट खोल पाण्याची टाकी बांधलेली आहे. सकाळी राऊळ बागेत फेरफटका मारायला आले असता, टाकीमध्ये काहीतरी हालचाल जाणवल्याने, त्यांनी आतमध्ये वाकून बघितले असता हा बिबट्याचे दर्शन झाले. लागलीच त्यांनी याबाबतची माहिती वनविभागाला दिली.
काही वेळातच वनविभागाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बचाव पथकाने टाकीमध्ये पिंजरा सोडत ग्रामस्थांच्या मदतीने त्याला पिंजऱ्यामध्ये त्याला पकडून सुखरुप बाहेर काढले. भक्ष्याच्या मागे धावत असताना तो विहिरीत पडला असावा, असे वनविभागाच्यावतीने सांगण्यात आले.
हा बिबट्या नर जातीचा असून साधारण त्याचे वय दिड ते दोन वर्षे असण्याचा कयास आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. शिंदे पुढे माहिती देताना म्हणाले की, काळा बिबट्या अत्यंत दुर्मिळ समजला जातो. तो प्रजातीने बिबट्या असला तरी काही जनुकीय बदलांमुळे त्याचा रंग वेगळा म्हणजेच काळा आहे. पशु वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.