राज्यभर सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा आज काम बंद आंदोलनाचा सहावा दिवस. संप सुरु झाल्यापासून आज पर्यंत रत्नागिरी विभागीय कार्यालयातून एकही एसटी बस सुटलेली नाही. सर्व कर्मचारी आणि संघटना या आंदोलनात सहभागी असून १०० % एसटी गाड्या बंद आहेत.
रत्नागिरी आणि राजापूर येथील काही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली आहे. तरी सुद्धा बहुतांश लोक हे मागण्या पूर्ण होण्यासाठी आंदोलनात सहभागी झाले आहेत. संध्याकाळी विभागीय कार्यालयाच्या बाहेर मोठ्या संख्येने लोक भजनामध्ये सहभागी होत आहेत तसेच रोज सकाळी वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळी काढून आपला एसटी महामंडळाच्या विरुद्ध असलेला रोष प्रकट करत आहेत.
आज सकाळी जी रांगोळी रेखाटण्यात आली आहे, त्यामध्ये एसटी गळफास घेत आहे अशा आशयाची आहे. कोरोना काळापासून एसटीचे संपूर्ण कामकाज बंदच पडले असून, आजपर्यंत ३७ कर्मचाऱ्यानी आत्महत्या देखील केली आहे. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काही ठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत.
अनेक वृत्त वाहिन्यांचे प्रतिनिधी संपाच्या ठिकाणी जाऊन कर्मचाऱ्याची भेट घेत आहेत. राज्य सरकारच्या विरोधात त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी दिसून येत आहे. अनेक वर्ष प्रलंबित असणाऱ्या मागण्या सरकार मान्य करत नसल्याने, आज हि वेळ ओढावली आहे. शासनाने तातडीने मागण्यांबाबत लक्ष घालावे अशी त्यांची मागणी आहे. अनेक विरोधी पक्ष सुद्धा मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचार्यांना पाठींबा दर्शविताना दिसत आहेत. परिवहन मंत्री अनिल परब सुद्धा वारंवार कर्मचार्यांना आवाहन करत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी संप त्वरित मागे घ्यावा. तुमच्या जवळजवळ सर्व मागण्या मान्य केल्या गेल्या आहेत. उरलेल्या मागण्या दिवाळीनंतर चर्चा करून पूर्ण करू असं लेखी आश्वासन देखील देण्यात आले आहे.

