समाजातील विविध सामाजिक प्रश्नांवर कायम अग्रेसर असलेल्या आणि सर्वसामान्य नागरिकांना एकत्रित करुन न्याय मिळवून देण्यासाठी प्रखर आंदोलने करणाऱ्या समविचारी संघटनेला आता राज्यव्यापी ‘महाराष्ट्र समविचारी सर्वसेवा कामगार संघटना’ म्हणून शासनाने श्रमिक संघ अधिनियम १९२६ अन्वये मान्यता दिल्याने समविचारीचे आता कामगार क्षेत्रांत पदार्पण झाले आहे.
या संघटनेचे पदाधिकारी म्हणून सर्वश्री संस्थापक अध्यक्ष प्रकाश तथा बाबा ढोल्ये, उपाध्यक्ष डॉ.गौरव ढोल्ये, चिटणीस निलेश म.आखाडे, सरचिटणीस संजय बबनराव पुनसकर, खजिनदार पदी सौ.प्रतिज्ञा ढोल्ये, सहखजिनदार रघुनंदन धो.भडेकर, सदस्यपदी राजाराम ना.गावडे यासह मानसेवी सदस्य म्हणून मनोहर गुरव आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र समविचारी सर्वसेवा कामगार संघटना सर्व विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांसह अनेक घटकांना अंतर्भूत करणारी रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली शासकीय नोंदणीकृत ट्रेड युनियन बनली असून, भविष्यामध्ये उत्कृष्ट सामाजिक कार्य करेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
सामाजिक प्रश्नांवर समविचारी सतत आग्रही राहून कार्यरत राहते. समविचारीला कामगार संघटनेची मान्यता मिळाल्याने समविचारीने अनेक उद्दिष्टे नमूद करुन ही नोंदणी मिळविली आहे. ठराविक कामगार डोळ्यापुढे ठेवून ही नोंदणी आणि मान्यता मिळलेली नसून या कामगार संघटनेच्या माध्यमातून अनेक आस्थापनातील कामगार कर्मचारी यांना न्याय देण्यात येणार आहे.
त्यामध्ये पुढील अनेक क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. सर्व क्षेत्रातील श्रमजीवी वर्ग, खाजगी, शासकीय, निमशासकीय, विनाअनुदान तत्वावरील शिक्षक, तसेच शासकीय निमशासकीय कंत्राटी कर्मचारी, संगणक परिचालक, आशा सेविका, खाजगी सुरक्षा कर्मचारी तसेच स्वायत्त संस्था विशेषतः आरोग्य, शिक्षण, कृषी, यासह आंबातोड कामगार, खलाशी, रापणवाले मच्छिमार, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, सागरी सुरक्षा रक्षक आणि वैद्यकीय शाखांचे पदवीधर डॉक्टर,खाजगी वेतनावर असणारे सर्व शाखांच्या वैद्यकीय आरोग्य कर्मचाऱ्यांचे व त्यामध्ये विविध तांत्रिक विषयांचे पदवीधर, वित्तीय संस्था कंपन्यांचे एजंट प्रतिनिधी,मानधन स्वीकारणारे पौरोहित्य करणारे तसेच मंदिरातील पुजारी, यासह अनुसुचि ‘अ’ ला अनुसरून ९२ उद्योग क्षेत्रातील त्यामध्ये रिक्षा, टँक्सी चालक, सफाई कामगार यासह खाजगी दवाखान्यात काम करणारे आरोग्य कर्मचारी अशा सर्व सेवांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.