चिपळूणमध्ये अतिवृष्टीमुळे जुलै महिन्यामध्ये ओढावलेली पूरजन्य स्थितीमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता. चिपळूणवासीय हि परिस्थिती पुन्हा उद्धभवू नये यासाठी, त्यावर सुरु करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर पूर्ण लक्ष केंद्रित करून आहेत. २२ जुलैची भयावह परिस्थिती आठवून सुद्धा अंगावर काटा उभा राहतो अशी स्थानिकांची सद्य मनस्थिती झाली आहे. नदीमधील गाळाचा उपसाच कित्येक वर्ष न झाल्याने एवढी पूरजन्य परीस्थिती उद्भवली. त्यामुळे लवकरात लवकर आणि वेळोवेळी नदीतील गाळाचा होणे गरजेचेच असल्याचे सांगितले जात आहे.
मुंबई-चिपळूण संगमेश्वर तालुक्याचे कार्यतत्पर आमदार शेखर निकम यांनी केंद्रीय पर्यावरण बंदर विकास तसेच नदी राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चिपळून शहरातील पुराबाबत उपाय योजना याबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी श्रीपाद नाईक यांना दिलेल्या सविस्तर निवेदनामध्ये नदीत गाळ उपसा करण्याची मागणी केली आहे. विशेष करून गोड बंधाऱ्यातील गाळ हा लवकरात लवकर काढण्यात यावा, असेही त्यांनी निवेदनात आणि झालेल्या चर्चे दरम्यान सांगितले.
या चर्चेत शेखर निकम यांनी आग्रहपूर्वक मागणी केली की, नदीत साठणाऱ्या गाळासंदर्भात कायमस्वरूपी उपाययोजना करावी तसेच चांगल्या प्रतीची वाळू ही नदीच्या दोन्ही बाजूने वापरून त्या ठिकाणी पर्यावरणात पर्यटनाला पूरक असे क्षेत्र तयार करावे. जेणेकरून येथील नदी पर्यटन विकसित होईल. आमदार शेखर निकम यांनी मागणीचे सर्व मुद्दे सविस्तरपणे मांडून, सद्य परिस्थिती व्यवस्थित कथन करून सांगितल्याने या मागणीला श्रीपाद नाईक यांनी सकारात्मक रित्या घेतले असून लवकरात लवकर याबाबत आपण योग्य निर्णय घेऊन कळवू असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.