रत्नागिरी शहरापासून साधारण ४० किमी असणाऱ्या देवळे गावामध्ये एक अजबगजब प्रकरण पुढे आले आहे. पुर्ये जांबवाडी येथे २० वर्षांपूर्वी एक बालवाडीची इमारत अस्तित्वात होती. हि बालवाडी युनिसेफच्या अंतर्गत बांधण्यात आली होती. हि बालवाडी बांधण्यात आली, तेंव्हापासून तेथे सेविका म्हणून दर्शना ठकार या कार्यरत होत्या.
या बालवाडीमध्ये कार्यरत असणाऱ्या सेविका ठाकर यांनी हि बालवाडीची इमारत जुनी झाली असून धोकादायक बनत चालली असल्याचे संबंधित ग्रामपंचायत कार्यलयात सांगून दुसरीकडे विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था करावी असे सुचविले. त्याप्रमाणे हि बालवाडी अन्यत्र शाळेमध्ये सुरु करण्यात आली.
त्या नंतर ठकार यांनी ती बालवाडीची इमारत पाडून त्याजागी नवीन इमारत बांधून घेतली. परंतु, तिचा वापर पुन्हा बालवाडीसाठी न करता त्याठिकाणी त्या आणि त्यांच्या कुटुंबाने वास्तव्य करायला सुरुवात केली. त्यामुळे हि केलेली बेकायदेशीर बाब लक्षात येताच, तेथील ग्रामस्थ मंगेश गोरुले यांनी याबाबत तक्रार दाखल केली. माहितीच्या अधिकाराखाली अशी माहिती मिळाली कि, २००९ सालीच्या कागदपत्रांवरून त्या २० वर्षापूर्वीच्या बालवाडीची नोंद जाऊन त्यावर बोअरवेलची नोंद करण्यात आली आहे.
अखेर गोरुले यांनी केलेल्या तक्रारीची सखोल चौकशी होऊन, बालवाडी सेविका ठकार या दोषी ठरल्या असून, त्यांनी युनिसेफतर्फे मंजूर झालेल्या बालवाडीच्या जागेवरच स्वत:चे घर बांधले असल्याचे त्यामध्ये निष्पन्न झाले. आणि या इमारतीच्या असेसमेंट उतार्यावर सुद्धा केवळ एकतर्फी नोंद करण्यात आली होती. याप्रसंगी सरपंच आणि ग्रामसेवकसुद्धा यामध्ये मिळालेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे अखेर तक्रारदार गोरुले यांनी १२ वर्ष केलेल्या पाठपुराव्याला न्याय मिळाला आहे. दोषींवर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करण्यात येईल हि अपेक्षा ठेवत असल्याचे त्यांनी म्हटले. आज बालवाडीच्या मुलांना त्यांच्या हक्काची इमारत आणि न्याय मिळाला असे ते पुढे म्हणाले.