रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक खेळाडू राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ठ कामगिरी बजावून रत्नागिरीची मान कायमच उंचावत असतात. काही खेळाडूंची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची असून काही वेळा अनेक सामन्यांना सुद्धा त्यांना पैशाच्या अडचणीपायी मुकावे लागते. परंतु, अशा खेळरत्नाना अनेक सामाजिक संस्था, वैयक्तिक बक्षिसांमुळे आर्थिक पाठबळ मिळते. त्यांमुळे त्यांच्या यशामधील मुख्य आर्थिक अडचणी दूर होतात. जगभरामध्ये क्रिकेटचे चाहते पसरले आहेत. पण हि स्पर्धा खो-खो खेळाची असून त्यामध्ये रत्नागिरीतील मध्यमवर्गीय मुलगी सायली कर्लेकर हिची हिमाचल प्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी निवड झाली.
राष्ट्रीय खो-खो स्पर्धेमध्ये राज्यासह रत्नागिरीला सन्मान मिळवून देण्यामध्ये सायली दिलीप कर्लेकर हिचा सिंहाचा वाटा आहे. २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीमध्ये हिमाचल प्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळाले. कर्नाटक, केरळ, दिल्ली या संघाना तर अंतिम सामन्यात पंजाब संघाला माघारी पाठवत १४ वर्षाखालील खो-खो स्पर्धेत प्रथम स्थान मिळवून दिले. तिच्या या अभूतपूर्व कामगिरीबद्दल रत्नागिरी भाजपा कार्यकर्ते यांनी तिच्या घरी जाऊन तिचा यथोचित सत्कार केला.
खो-खो राष्ट्रीय स्पर्धेत १४ वर्षाखालील संघात सहभाग मिळवत सुवर्णपदकाची कामगिरी करणाऱ्या सायली दिलीप कर्लेकर हिच्या निवासस्थानी भेट देत भाजपा कार्यकर्ते यांनी तिचे अभिनंदन केले व या नंतर कधीही काही मदत लागली तर आम्ही आणि आमच्या पक्षाच्या वतीने आवर्जून सहाय्य करू असे सांगितले.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहर सरचिटणीस राजन पटवर्धन, जिल्हाध्यक्ष निलेश आखाडे, बबन आंबेकर आदी. उपस्थित होते. पंकज चवंडे आर्यन स्पोर्ट्स क्लब यांचे यामधील योगदान महत्वाचे असल्याचे सायलीने भाजपा कार्यकर्ते यांच्याशी बोलताना सांगितले. तसेच क्रीडा प्रशिक्षक संदीप तावडे, विनोद मयेकर यांनी देखील वेळोवेळी मार्गदर्शन केले असल्याचे तिने सांगितले.