मागील दोन दिवस देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण करता यावे, याकरिता बँकींगशी संबंधित कायद्यामध्ये दुरुस्ती करणारे विधेयक संसदेच्या या हिवाळी अधिवेशनात सरकारतर्फे मांडण्यात येणार आहे. या कृत्याच्या विरोधात व एकूणच सार्वजनिक बँकांच्या खासगीकरणाच्या धोरणा विरोधात देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँक कर्मचारी व अधिकारी यांनी पुकारलेला संप रत्नागिरीमध्ये पूर्णतः यशस्वी झाल्याचा दावा बँक कर्मचारी संघटनांनी केला आहे.
रत्नागिरीमध्ये १६ व १७ डिसेंबर असे दोन दिवस पुकारलेल्या संपाचा गुरूवारी पहिला दिवस होता. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन,एन.सी.बी.ई.,ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन सहित एकूण आठ संघटना व त्यांचे सुमारे १० लाख बँक कर्मचारी व अधिकारी यांनी या संपामध्ये सहभाग घेतला होता.
या दोन दिवसाच्या संपाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून, शहरातील तसेच जिल्ह्यातील संपूर्ण बँकींग सेवा ठप्प झाल्या होत्या. संपकरी अधिकारी व कर्मचारी यांनी रत्नागिरीमध्ये गाडीतळ येथील बँक ऑफ महाराष्ट्र समोर जोरदार निदर्शने केली. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स या बँक कर्मचारी व अधिकारी यांच्या शिखर संघटनेने बँकांचे खासगीकरण संदर्भात संप पुकारलेला होता.
सलग दोन दिवस असलेल्या संपामुळे, अनेक आर्थिक व्यवहार करताना अडचणी निर्माण झाल्या. ग्रामीण भागातून आलेले नागरिक ज्यांना या संपाबद्दल काही कल्पनाच नव्हती त्यांना फुकटचा हेलपाटा पडला. आधीच एक तर एसटी च्या संपामुळे खिशावर आर्थिक भार पडला असताना, बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे अधिकच अडचणी निर्माण झाल्या. परंतु, संपाला मात्र पूर्णपणे प्रतिसाद मिळून संप यशस्वी झाल्याचे बोलण्यात येत आहे.