मागील महिनाभरापासून जयगड समुद्रामध्ये मोठ्या वाहतूक बोटाने धडक दिल्याने या मच्छीमारी बोटीला जलसमाधी मिळाल्याचे वृत्त समोर येत होते. परंतु, बोटीचा अवशेष सुद्धा सापडत नसल्याने नक्की बोटीचे काय झाले याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक प्रकारे माहिती मिळण्यासाठी पोलीस, बोटीचे मालक तसेच स्थानिक प्रयत्न करत होते. पण त्यावर काहीच माहिती मिळत नव्हती. एका खलाशाचा तेंव्हाच मृतदेह ताब्यात मिळाला होता. त्यावरून बोट बुडाली हे निश्चित होत होते, परंतु उर्वरित खलाशांचा आणि बोटीचा शोध न लागल्याने नक्की नावेद-२ बोटीचे काय झाले हे कळायला मार्ग नव्हता.
जयगड समुद्रात महिन्याभरापूर्वी बेपत्ता झालेल्या नावेद दोन या मच्छीमारी नौकांच्या शोधासाठी पोलिसांनी तिन स्कूबाड्रायव्हरच्या मदतीने विशेष मोहीम राबवली. जयगड किनाऱ्यापासून दोन नॉटिकल मैलांवर समुद्राच्या तळाशी नावेद-२ ही नौका वाळूमिश्रित चिखलात रुतलेली असल्याचे नौदलाच्या सोनारयंत्रणेने निश्चित केले. त्यानंतर स्कुबा ड्रायव्हर्सनी नौकेवर जाळ्यात अडकलेला सांगाडा बाहेर काढला आहे.
हा सांगाडा बोटीवरील खलाशाचा असून ओळख पटवण्यासाठी डीएनए तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. आता रुतलेल्या नावेद-२ ला बाहेर काढण्यासाठी मोठ्या जहाजांच्या मदतीने पुन्हा विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. बेपत्ता झालेल्या मच्छिमारी नौकेवर एकूण सात खलाशी होते, त्यातील एकाचा मृतदेह सापडला होता.
दुसरा मृतदेह समुद्रात तरंगताना आढळला होता मात्र तो बाहेर काढणे शक्य झाले नव्हते. आता बोटींवर सापडलेल्या सांगाडय़ामुळे तिसर्या खलाशाचा शोध लागणार आहे, मात्र अद्यापही चार खलाशांचे मृतदेह वाहून गेले कि अशाच प्रकारे नौकेत सापडतील याबाबत स्पष्टता झालेले नाही.