अमित शहा पुण्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी थेट महा आघाडी सरकारवरच हल्ला चढवत, येत्या पुणे महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला विजयी करण्याचं आवाहन केलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले कि, सत्ता हा माझा अधिकार आहे आणि कोणत्याही प्रकारे मिळवणार असं शिवसेना म्हणत आहे, अशी टीका करतानाच हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि मैदानात या. तुमच्याशी दोन हात करायला आम्ही तयार आहोत, असं खुलं आव्हानच भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
राज्यातील आघाडी सरकार म्हणजे तीन चाकांचं ऑटोरिक्षावालं सरकार आहे. या सरकारची तीनही चाकं पंक्चर झालेली आहेत. ते चालत नाही. फक्त धूर सोडतं आणि प्रदूषण करतं, अशी टीका केंद्रीय मंत्री शहा यांनी पुण्यात केली. महाराष्ट्रातील जनतेच्या घराघरात जा. हे सरकार महाराष्ट्राचं कल्याण करू शकते का? असा सवाल करा, असही खोचक टोला शहा यांनी त्यावेळी लगावला.
राज्यामध्ये सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीमधील प्रमुख पक्ष असणारा शिवसेना आणि विरोधी पक्ष भाजपा पुन्हा आमने-सामने आल्याचं चित्र दिसत आहे. रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेला लक्ष्य करीत, ”हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा आणि तिन्ही पक्षांनी एकत्र लढून भाजपशी दोन हात करावे”, असे थेट आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुण्यातील सभेत दिले.
या आव्हानाला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये उत्तर दिलं आहे. शाह यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान देत राजीनामा देण्यासंदर्भात वक्तव्य केल्याचा संदर्भ देत राऊत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, राऊत यांनी आधी भाजपाच्या १०५ आमदारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत शाह यांच्या आव्हानाला प्रति आव्हान दिले आहे. शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय तुमचे १०५ आमदार निवडून येणं शक्य नव्हतं. तुमच्या १०५ आमदारांनी राजीनामा द्यावा आणि परत १०५ निवडून आणून दाखवावेत, हे सुद्धा आमचं आव्हान आहे,” असं राऊत म्हणालेत.