झी मराठीवरील अल्प कालावधीत प्रसिद्धीस पावलेली ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. या मालिकेतील प्रमुख फेमस जोडी ओम आणि स्वीटू हीला तर प्रेक्षकांची विशेष पसंती आहे. या दोघांच्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.
या दोघांचा चाहतावर्ग देखील खूपच मोठा आहे. नुकतंच मालिकेमध्ये कोकणातील रत्नागिरीमधील जयगड येथील गणपती मंदिरामध्ये ओम आणि स्वीटू यांचा विवाहसोहळा संपन्न झाला. अनेक अडचणींवर मात करत अखेर ओम आणि स्वीटू लग्न करून एकत्र आले आणि याचा आनंद प्रेक्षक आणि चाहत्यांना देखील झाला आहे.
ओम आणि स्वीटू यांनी त्यांचा हा आनंद अनोख्या पद्धतीने आपल्या चाहत्यांसोबत साजरा करण्याचे ठरवले आहे. ओम आणि स्वीटू यांनी १९ डिसेंबर रोजी ज्या जोडप्यांची लग्न होती त्यांना, त्यांची विवाह पत्रिका सोशल मीडियावर पाठवायचं आवाहन केलं होत आणि त्यातील एका जोडीच्या लग्नात उपस्थिती दर्शवण्याचं चाहत्यांना प्रॉमिस केलेलं.
या अनोख्या प्रॉमिसमुळे चाहत्यांमध्ये सुद्धा उत्साह निर्माण झाला. त्यांनी केलेल्या प्रॉमिस प्रमाणेच प्रेक्षक-चाहते सौरभ आणि जुही यांच्या लग्नामध्ये ओम आणि स्वीटू यांनी प्रत्यक्ष हजेरी लावली आणि या नवदाम्पत्याला त्यांच्या भावी आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.
चाहते आपल्या आवडत्या कलाकाराला पाहण्यासाठी कायमच उत्सुक असतात. आणि कलाकार सुद्धा काही वेळेला आपली बिझी दिनक्रमातून वेळ काढून काहीतरी छोटस सरप्राईज नक्कीच प्लान करतात. ओम आणि स्वीटूला आपल्या लग्नात पाहून या जोडप्याला सुखद धक्काच बसला असून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांची ती प्रतिक्रिया आणि ओम स्वीटू सोबत त्यांचा एक झकास फोटो सोशल मीडियावर कलाकारांनी शेअर केला आहे. चाहते आणि कलाकार यांच्यातील नातं अजून घट्ट करण्याचा ओम आणि स्वीटू यांचा हा प्रयत्न नक्कीच माणुसकीचे दर्शन घडविणारा होता.