शेती आणि शेतकरी हे समीकरण काळानुरूप बदलत आहेत. सुरुवातील केवळ पारंपारिक पद्धतीने करण्यात येणारी शेती आता मात्र विविध अद्ययावत तंत्रांचा वापर करून करण्यात येते. शेतकरी सुद्धा आता विविध प्रकारची शेती विविध हंगामात घेऊ लागले आहेत. त्यामुळे जमीन पडीक न राहता, मातीचा कसही टिकून राहतो. विविध नवीन येणारी तंत्रज्ञानेसुद्धा शेतकरी अवगत करून लागले आहेत. जेणेकरून शेतीचे अनेक प्रयोग करून बारमाही उत्पन्न घेता येईल.
शेती व्यवसायामध्ये हल्ली मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. पिकांवरील किडींचे नियंत्रण ठेवण्याच्या पद्धतीमध्येही बदल होत आहे. मागील काही महिन्यांपूर्वी ड्रोनच्या वापरावर केंद्र सरकारने काही नियमावली जारी केली आहे. आता ड्रोन वापराची प्रत्यक्ष गरज असून जानेवारी महिन्यापासून कोकणातील शेतकर्यांना ड्रोन कसे हाताळायचे, याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
कोकण कृषी विद्यापीठात नव्या तंत्राची माहिती देण्यासाठी केंद्राची उपलब्धता करण्यात येणार आहे. तसेच शेतीच्या कामांसाठी ड्रोन कॅमेरा किती उपयुक्त आहे, याची माहिती आणि प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ड्रोनच्या वापराने पीकस्थिती, पीकपाहणी, फवारणी, किड रोग निर्मूलन, किडींचे व्यवस्थपान आदी कामे सोपी होणार आहेत. पिकावर पडलेली कीड आणि त्याचा प्रादुर्भाव ड्रोनच्या हाय डेफिनिशन लेन्स कॅमेरा मुळे सहज पहायला मिळणार आहे.
किडीवर आळा घालण्यासाठी योग्य ती प्रमाणात औषधे वापरता येणार आहेत ड्रोनच्या वापरामुळे कमी खर्चात आणि कमी वेळेत औषधे फवारणी होऊ शकणार आहे. ठराविक उंचीवरून फवारणी केल्याने, सगळीकडे समसमान फवारणी होण्यास मदत होणार आहे. मुख्यता: बागयती क्षेत्रामध्ये या तंत्राचा अवलंब करणे शक्य होणार आहे.