कोरोना काळामध्ये सध्या नोकरी नसल्याने, तसेच अनेक जणांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या त्यामुळे अनेक जण नोकरी, काम धंद्याच्या शोधात आहेत. आणि अशाचाच गैरफायदा फसवणूक करणारे भामटे घेतात. आणि गरीब बेरोजगार लोकांची फसवणूक करतात.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, सावंतवाडी तालुक्यात चौघांकडून रेल्वेमध्ये नोकरीला लावतो असे सांगून प्रत्येकी दीड लाख रुपये उकळून फसवणूक करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. सुरेश वसंत प्रभूखानोलकर असे या गुन्हेगाराचे नाव आहे. दरम्यान, संशयितांचे वाय ७० वर्षे असून त्याची तब्येत बिघडल्याने त्याला उपचारासाठी कोल्हापूर येथील रुग्णालयात हलवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या फसवणूक प्रकरणी वेत्ये येथील संदीप रामा गावडे यांनी पोलिसात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून संशयिताला अटक करण्यात आले आहे. सुरेश प्रभूखानोलकर याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २९ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. संशयित सुरेश हा मूळ खानोली गावातील असून तो काही वर्षापासून सावंतवाडी नजीक माजगाव- चिपटेवाडी येथील एका घरात भाड्याने राहत होता.
आपली रेल्वेमध्ये मोठ्या अधिकाऱ्याशी ओळख आहे. नोकरी हवी असल्यास दीड लाख द्यावे लागतील असे तो अनेकांना सांगायचा. त्याच्यावर विश्वास ठेवत फिर्यादीने आपल्या जवळच्या दोन नातेवाईकांना रेल्वेत नोकरी मिळेल या आशेने दोघांकडून प्रत्येकी दीड लाखाप्रमाणे ३ लाख रुपये घेऊन त्या संशयिताला दिले.
मात्र, पैसे घेऊन देखील दोन महिने झाले तरी तो कायम विषय टाळाटाळ करत असल्याचं दिसून आल्याने त्याच्या कारनाम्याची माहिती घेत असता आणखी काहीजणांकडून नोकरी लावण्यासाठी तीन लाख रुपये घेतल्याचे पुढे आले. यामुळे फिर्यादी व ग्रामस्थांनी त्याच्या विरोधात सावंतवाडी पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला. त्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत असताना, तो खानोली येथील घरी सापडला. घरातून त्याला उचलून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या गुन्हयात गावातील आणखी एक त्याचा साथीदार असून, सध्या पसार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.